इन्कम टॅक्स कमिश्नर आणि रॉ अधिकारी असल्याचं भासवून इंजिनीअरनं केली तरुणीची फसवणूक; लाखो रुपयांना घातला गंडा
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : आजकाल ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या साठी गुन्हेगार विविध प्रकारच्या युक्त्या आणि माध्यमांचा वापर करतात. मुंबईमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मुंबई सेंट्रल येथील एका 25 वर्षांच्या तरुणीची 11.13 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 44 वर्षांच्या अभियांत्रिकी डिप्लोमाधारकाला गमदेवी पोलिसांनी अटक केली आहे.
इन्कम टॅक्स कमिश्नर आणि रिसर्च अँड अॅनालिसीस विंगचा (रॉ) अधिकारी असल्याचं भासवून या व्यक्तीनं हा गुन्हा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लखनौमध्ये यूपीएससी कोचिंग अकादमी चालवत होता. तिथे नुकसान सोसल्यानंतर त्यानं महिलांची अशा प्रकारे फसवणूक सुरू केली. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा : 8 वर्षांचे प्रेम, पतीला घेऊन तरुणी थेट पोलीस ठाण्यात, प्रकरण समजल्यानंतर पोलिसांनाही धक्का
राजेश कुमार उपाध्याय असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश कुमार एका डेटिंग अॅपवर पीडित तरुणीला भेटला होता. त्यांची मैत्री झाल्यानंतर त्यानं तिला सांगितलं की, तो अनेक अशासकीय संस्थांशी (एनजीओ) जोडलेला आहे. या संस्था चांगलं काम करत आहेत. तिला एनजीओचं सदस्य बनवण्यासाठी त्यानं तिच्याकडे कागदपत्रे मागितली. या कागदपत्रांचा वापर करून, त्यानं पाच लाख रुपयांचं वैयक्तिक कर्ज घेतलं. या शिवाय, त्याने तिला त्याच्या बँक खात्यात 6.13 लाख रुपये जमा करण्यासही तयार केलं.
गमदेवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय दंडवते यांनी सांगितलं, “राजेश उपाध्याय हा मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा धारक आहे. त्यानं यूपीएससी अकादमी सुरू करण्यासाठी नोकरी सोडली होती. कोविड -19 साथीच्यापूर्वी त्याचं मोठं नुकसान झालं. ज्यामुळे त्याला अकादमी बंद करावी लागली.”
अकादमी बंद केल्यानंतर, उपाध्यायनं सिद्धांत धवन नाव धारण केलं. कधी इन्कम टॅक्स कमिश्नर तर कधी रॉ अधिकारी म्हणून त्यानं ओळख सांगण्यास सुरुवात केली. दंडवते म्हणाले, “त्यानं याच नाव आणि ओळखीसह अनेक डेटिंग अॅप्सवर आपलं प्रोफाइल क्रिएट केलं. अनेक महिलांशी संपर्क साधून त्यांना लग्नाचं आश्वासन दिलं.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं तक्रारदार तरुणीकडून तिला एका एनजीओचं सदस्य बनवण्यासाठी कागदपत्रे घेतली. त्यांचा वापर करून तिच्या नावावर कर्ज घेतलं. ऑगस्ट 2021 ते जानेवारी 2022 या काळात तो कोणत्या ना कोणत्या कारणानं तिच्याकडून पैसे घेत राहिला. जेव्हा तिने आणखी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यानं तिला धमकी दिली की, तो तिचे फोटो मॉर्फ करून ते व्हायरल करू शकतो.
हे ही वाचा : लग्नाला जाण्यापासून रोखल्यावर पत्नीने दिला जीव, पतीनेही उचलले भयानक पाऊल
तक्रारदार तरुणीनं मे 2022 मध्ये पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर, पोलिसांनी उपाध्याय याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला. “आम्ही त्याचा माग काढला आणि त्याला अटक केली,” असं गमदेवी पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले. “आम्हाला त्याच्या फोनमध्ये अनेक महिलांचे फोटो सापडले आहेत आणि आम्ही त्याची चौकशी करत आहोत,” असंही ते म्हणाले.