JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मराठी भाषा दिन : महाराष्ट्रात एकूण किती बोली भाषा आहेत? तुम्हाला कोणती आवडते?

मराठी भाषा दिन : महाराष्ट्रात एकूण किती बोली भाषा आहेत? तुम्हाला कोणती आवडते?

महाराष्ट्रात मराठी ही मूळ भाषा असली तरी, ती प्रत्येक विभागात, जिल्ह्यात मराठी बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे. त्या मराठीच्या बोलीभाषा आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रवारी : २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने मराठी भाषेच्या बोलीभाषांविषयी जाणून घेऊ या. भाषा हे विचार, भावना व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम आहे. दर थोड्या अंतरावर भाषा बदलते, असं मानलं जातं. महाराष्ट्रात मराठी ही मूळ भाषा असली तरी, ती प्रत्येक विभागात, जिल्ह्यात मराठी बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे. त्या मराठीच्या बोलीभाषा आहेत. महाराष्ट्राच्या आदिवासी भागात तिथली स्थानिक बोलीभाषा संवादासाठी वापरली जाते. या बोलीभाषांमुळे मूळ प्रमाण भाषाही समृद्ध होत असते. महाराष्ट्रात सुमारे 60 ते 70 बोलीभाषा आहेत. त्यापैकी काही प्रमुख बोलीभाषांविषयी जाणून घेऊ या. महाराष्ट्रात अहिराणी, मालवणी, कोकणी, आगरी (कोळी), वऱ्हाडी, मराठवाडी, झाडी, कोल्हापुरी/ सातारी, संगमेश्वरी, पोवरी, कोहळी, खानदेशी लेवा, वाडवळी, चंदगडी, सामवेदी या काही प्रमुख बोलीभाषा आहेत. याशिवाय कातकरी, कोकणा, कोरकू, गोंडी, माडिया, ठाकरी, वारली, मावची, कोलामी, देहवाली, ढोर कोळी या आदिवासी पट्ट्यात बोलल्या जाणाऱ्या काही प्रमुख बोलीभाषा आहेत. तसंच राज्यात भटक्या-विमुक्त समाजाच्याही वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत. या भाषांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा गोडवा जाणवतो. त्यात कैकाडी, कोल्हाटी, चितोडिया, नंदीवाले, पारधी, बेलदार, मांग गारुडी, वैदू, घिसाडी, गोरमाटी, गोल्ला, गोसावी आदी बोलींचा समावेश आहे. बोलीभाषांमध्ये त्या त्या प्रदेशाचं, तिथल्या संस्कृतीचं, त्या समाजाच्या चालीरीती, प्रथा-परंपरा, रूढी, व्यवसाय आदींचं प्रतिबिंब पडलेलं असतं. त्या त्या भाषेतल्या म्हणी, वाक्प्रचार हा समृद्ध ठेवा आहे. प्रत्येक बोलीचा लहेजा, हेल काढण्याच्या पद्धती वैशिष्ट्यपूर्ण असतात. या पद्धतीच त्या त्या बोलीचं वेगळेपण ठरवतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बोलल्या जाणाऱ्या काही बोलीभाषांविषयी जाणून घेऊ या. अहिराणी बोलीभाषा : अहिराणी उत्तर महाराष्ट्रात खानदेशात म्हणजेच जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण, मालेगाव, कळवण या भागात बोलली जाते. खानदेशलगतच्या वऱ्हाडातल्या काही भागांतही अहिराणी बोलली जाते. प्रसिद्ध कवियत्री बहिणाबाई यांच्या अनेक कविता अहिराणीत आहेत. बहिणाबाईंमुळे या भाषेला विशेष प्रतिष्ठा मिळाली आहे. अलीकडे या बोलीभाषेतली अनेक गाणी विशेष लोकप्रिय होत आहेत. खानदेशातले अनेक गीतकार खास अहिराणीत गीतलेखन करताना दिसतात. मालवणी : मालवणी बोलीभाषा प्रामुख्याने कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाते. या बोलीभाषेला कुडाळी असंही म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जवळपास प्रत्येक तालुक्यात बोलल्या जाणाऱ्या मालवणी बोलीत थोडे-फार फरक आहेत; पण एकंदरीतच ही भाषा खूप गोड आहे. गंगाराम गवाणकर आणि मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’ या गाजलेल्या नाटकामुळे या बोलीभाषेचा परिचय जगभरातल्या लोकांना झाला. आजही अनेक लेखक, कवी, नाटककार या बोलीभाषेत आवर्जून लिहितात. विशिष्ट हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीभाषेचं खास वैशिष्ट्य होय. EXPLAINER: क, ख, ग, घ… आपण रोज वापरतो ती देवनागरी लिपी देणारे कोण होते? आगरी (कोळी) : ही बोलीभाषा राज्यातल्या उत्तर आणि मध्य कोकणात प्रामु्ख्याने बोलली जाते. रायगड, ठाणे या भागातले कोळी लोक आगरी बोलतात. या बोलीतही बरंच गीतलेखन होतं. तसंच, टीव्हीवरच्या विनोदी कार्यक्रमांत या बोलीतली स्किट्सही सादर होतात. कोल्हापुरी/सातारी : कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती तेथील रांगड्या स्वभावाची प्रेमळ माणसं. अर्थात तिथली बोलीभाषाही अशीच आहे. वेगळा लहेजा आणि कसलाही आडपडदा न ठेवता थेट भावना व्यक्त करणारी ही बोलीभाषा रांगडी वाटत असली तरी त्यात खूप गोडवा आहे. कोल्हापूर, सातारा आदी भागांत ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते. मराठी ग्रामीण साहित्यातदेखील या भाषेचा वापर केला गेला आहे. मराठवाडी : मराठवाडी हीदेखील अत्यंत वैशिष्टयपूर्ण अशी बोलीभाषा आहे. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात या बोलीभाषेतून संवाद साधला जातो. या भाषेवर कानडी आणि उर्दू भाषेचा प्रभाव जाणवतो. मराठवाडी बोलीतल्या आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. झाडी बोली : विदर्भातल्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागाला झाडीपट्टी म्हणतात. या भागांमध्ये झाडीबोली बोलली जाते. संत-साहित्यातदेखील झाडी बोलीतल्या शब्दांचा वापर दिसून येतो. या बोलीवर संस्कृत, गोंडी, तेलुगू, हिंदी आदी भाषांचा प्रभाव दिसून येतो. महाराष्ट्रातील बोलीभाषा :

अहिराणीकोकणीआगरी (कोळी)वऱ्हाडी
मराठवाडीझाडीकोल्हापुरी/ सातारीसंगमेश्वरी
पोवरी कोहळीखानदेशी लेवावाडवळी
चंदगडीसामवेदीकातकरीकोकणा
कोरकूगोंडीमाडियाठाकरी
वारलीमावचीकोलामीदेहवाली
ढोर कोळीकैकाडीकोल्हाटीचितोडिया
नंदीवालेपारधीबेलदारमांग गारुडी
वैदूघिसाडीगोरमाटीगोल्ला
गोसावी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या