EXPLAINER: क, ख, ग, घ... आपण रोज वापरतो ती देवनागरी लिपी देणारे कोण होते?

EXPLAINER: क, ख, ग, घ... आपण रोज वापरतो ती देवनागरी लिपी देणारे कोण होते?

देवनागरी लिपी (Devanagari Script) ही अनेक भारतीय भाषांची प्रमुख लेखनपद्धती आहे. ही लिपी देशातल्या आणि देशाबाहेरच्या तब्बल 194 भाषांसाठी वापरली जाते. देवनागरी लिपीचा सर्वांत पहिला प्रयोग गुजरातच्या नरेश जयभट्ट यांच्या शिलालेखात आढळतो.

  • Share this:

मुंबई, 8 जुलै: देवनागरी लिपी (Devanagari Script) ही अनेक भारतीय भाषांची प्रमुख लेखनपद्धती आहे. ही लिपी देशातल्या आणि देशाबाहेरच्या तब्बल 194 भाषांसाठी वापरली जाते. देवनागरी लिपीचा सर्वांत पहिला प्रयोग गुजरातच्या नरेश जयभट्ट यांच्या शिलालेखात आढळतो. साहित्याच्या इतिहासात दिलेल्या संदर्भांनुसार 8व्या शतकात राष्ट्रकुल राजांमध्ये ही लिपी प्रचलित होती. 9व्या शतकात बडोद्याच्या ध्रुवराजांनीही शासनाचे आदेश देण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर केला होता, असे संदर्भ सापडतात. या लिपीचं नाव देवनागरी का पडलं, याबाबत अनेक कथा आणि मतमतांतरं आहेत. देवनागरी लिपी ही गुजरातच्या नागर ब्राह्मणांशी संबंधित असल्यानं हे नाव पडल्याचंही म्हटलं जातं.

नागवंशी राजांची हीच लिपी असल्यानं तिला देवनागरी नाव दिलं गेलं, असंही म्हटलं जातं; मात्र हे सर्व केवळ अंदाज असल्यानं ही मतं विश्वासार्ह मानली जात नाहीत. ब्राह्मी लिपीशी संबंध असल्याची गोष्ट सर्वांत विश्वासार्ह मानली जाते. ब्राह्मी लिपीच्या उत्तर शाखेला नागरी (Nagari) असं म्हटलं जायचं. ती नंतर संस्कृत भाषेशी जोडली गेली आणि कालांतराने देवनागरी झाली; मात्र आधी ब्राह्मी लिपी (Brahmi Script) म्हणून ओळख असल्यानं नागरी लिपीचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळत नाही. काही लोकांच्या मते ही लिपी केवळ नगरांमध्येच वापरली जायची त्यामुळे तिला नागरी लिपीचं नाव दिलं गेलं.

महोदयचा राजा विनायकपाल याच्या 794 मधला ताम्रपटात नागरी लिपी आढळून येते. अकराव्या शतकात मध्य भारतात सर्वत्र नागरी लिपीचाच प्रसार झाल्याचं आढळून येतं. मध्य भारतातील 968 मधील सियाडोनी येथील लेखांत हीच लिपी दिसून येते. दहाव्या शतकाच्या अखेरीच्या गुजरातमधल्या पहिल्या चालुक्य राजाच्या ताम्रपटांतून उत्तरेकडची नागरी लिपी आढळून येते. गढवालचा राष्ट्रकूटराजा मदनपाल, माळव्याचे परमार, चंदेरीचे चंदेल्ल, त्रिपुरीचे कलचुरी ह्या राजांच्या ताम्रपटांतून आणि शिलालेखांतून उत्तरेकडील नागरी लिपीच्या विविध प्रकारच्या धाटण्या आढळून येतात. आठव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंतच्या कालखंडात या लिपीमध्ये पुष्कळ स्थित्यंतरे झाली, असं मराठी विश्वकोशात म्हटलंय.

देवनागरी लिपीमध्ये (Devanagari lipi) अक्षर लिहिताना त्यावर एक शिरोरेघा ओढली जाते. तिला शीर्षरेषा असंही म्हणतात. देवनागरी लिपीत अक्षरं डावीकडून उजवीकडे लिहिली जातात. देवनागरी लिपीला हिंदी लिपीदेखील म्हटलं जातं. यात शून्य ते नऊ असे अंक आहेत. हिंदी वर्णमालेत अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ऋ ॠ ऌ ॡ हे स्वर असून, क ख ग घ ङ, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ ण (ड़, ढ़), त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व, श ष स, ह क्ष त्र ज्ञ ही व्यंजनं आहेत.

देवनागरी लिपीत एकूण 52 अक्षरं आहेत. त्यामध्ये 14 स्वर आणि 38 व्यंजनं (Consonants & vovels) आहेत. देवनगरी काशीमध्ये ही लिपी प्रचलित होती त्यामुळे तिला देवनागरी नाव पडलं, असंही म्हटलं जातं. काही इतिहासकारांच्या मते महाराष्ट्रातल्या नंदीनगरमध्ये ही लिपी होती, तीच पुढे देवनागरी नावाने ओळखली जाऊ लागली. दक्षिण भारतातल्या विजयनगरच्या राजांनी दानपत्रांच्या लिपीला नंदीनगरीचं नाव दिलं होतं. विजयनगर राज्याच्या लेखांमध्ये नागरी लिपी वापरली गेली आहे. 10व्या शतकात पंजाब आणि काश्मीरमध्ये शारदा लिपीचा वापर केला गेला. या लिपीला ब्रह्मा (ब्राह्मी) लिपीची बहीण मानलं जातं.

देवनागरी लिपीचा वापर संस्कृत, प्राकृत, हिंदी, मराठी आणि नेपाळी भाषा लिहिण्यासाठी होतो. आधुनिक भारताची संपूर्ण भाषा प्रणाली यातून निर्माण झाली आहे, असं मानलं जातं. मुख्य भाषांशिवाय कोंकणी, सिंधी, काश्मिरी, गढवाली, बोडो, अंगिका, मगही, भोजपुरी, मैथिली आणि संथाली यांसारख्या बोलीभाषादेखील देवनागरी लिपीत लिहिल्या जातात.

गुजराती, पंजाबी, विष्णुपुरिया, मणिपुरी, रोमन आणि उर्दू भाषादेखील देवनागरीमध्ये लिहिल्या जातात. या लिपीचा सर्वांत प्राचीन उल्लेख इसवी सन 453 मध्ये जैन ग्रंथात सापडतो. या लिपीत अक्षरांची पूर्ण व्यवस्था असल्यानं तिला अक्षरांची लिपीदेखील म्हटलं जातं. जगातल्या काही प्रचलित लिपींपैकी देवनागरी ही सर्वांत पूर्ण आणि वैज्ञानिकदृष्ट्या योग्य मानली जाते. ही लिपी लिहिण्यात आणि बोलण्यात काहीच फरक नाही. जसं बोलतो तसंच लिहिलं जातं.

First published: July 8, 2021, 10:00 AM IST

ताज्या बातम्या