ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 16 मे : कुष्ठरोग हा जुना आजार असला तरी आजही त्याच्या प्रसाराबाबत निरनिराळे गैरसमज रूढ आहेत. कुष्ठरोग हा स्पर्शाने पसरणारा आजार नसून सध्याच्या बहुविध औषधोपचारांमुळे तो पूर्णत: बरा होतो. त्यामुळे समाजाचा या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत आहे. हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे. या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी याची योग्य माहिती समजून घेणे, इतरांना देणे आणि गैरसमज, भीती दूर करणे गरजेचे आहे. लातूरमध्ये महात्मा गांधी कुष्ठधाम वसाहत असून येथे जवळपास 700 रुग्ण एकत्र राहतात. कुष्ठरोग हा महारोग नाही कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरिअम लेप्री या जंतूमुळे होणारा सांसर्गिक आजार आहे. कुष्ठरोगाची सांसर्गिकता ही शरीरातील कुष्ठजंतूच्या प्रमाणावर अवलंबून असते. दृष्य स्वरूपातील विकृती किंवा विद्रूपतेवर नाही. कुष्ठरोग हा महारोग नसून स्पर्शाने मुळीच पसरत नाही. उपचार न घेतलेल्या संसर्ग झालेल्या कुष्ठरुग्णांकडून जंतूचा प्रसार हवेमार्फत होतो. केवळ औषधोपचोर न घेतलेल्या कुष्ठरुग्णांकडूनच या रोगाच्या जंतूचा प्रसार होतो. कुष्ठजंतूंचा हवेमार्फत शरीरात प्रवेश झाल्यानंतर साधारणत: तीन ते पाच वर्षांनंतर प्राथमिक लक्षणे शरीरावर दिसायला लागतात. कुष्ठरोगाचे जंतू मुख्यत्वे चेतातंतू आणि त्वचा यावर आघात करतात.
पाप-पुण्याचा संबंध नाही कुष्ठरोग हा आजार अनुवंशिक नाही. पाप-पुण्य याचाही या आजाराशी कोणताही संबंध नाही. नवस फेडणे, मंत्र-तंत्र वा जडीबुटी हा या आजारावरील उपाय नाही. वास्तविक कुष्ठरोगाविरुद्धच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीमुळे 98 टक्के लोकांना हा आजार होणे अशक्यच आहे. हा आजार अत्यल्प संसर्गजन्य रोग असून प्रतिकारशक्ती कमी असलेल्या केवळ दोन टक्केच लोकांना हा आजार होऊ शकतो. 1948 पर्यंत या आजारावर प्रभावी औषध उपलब्ध नव्हते. त्यामुळे हा एक असाध्य रोग समजण्यात येत होता. 1980 मध्ये बहुविध औषधोपचार (मल्टी ड्रग) पद्धती विकसित झाल्याने हा आजार नियंत्रणात आणणे शक्य झाले. कुष्ठरुग्ण शोध मोहीम कुष्ठरोगाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होत नसल्याने स्वत:हून हे रुग्ण सहसा उपचारासाठी येत नाहीत. तेव्हा कुष्ठरोग नियंत्रणासाठी राज्यभरात 1998 पासून कुष्ठरुग्ण शोधमोहीम राबवण्यात आली. प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरुग्ण एकाच वेळी शोधून औषधोपचाराखाली आणून कुष्ठरोगाचे दर दहा हजारी प्रमाण कमी करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या मोहिमेतून कुष्ठरोगाचे 2005 साली दूरीकरण झाल्याचे जाहीर केले. म्हणजेच दर दहा हजारी लोकसंख्येत कुष्ठरोगाचे प्रमाण एकपेक्षाही कमी असणे. दूरीकरण झाले असले तरी कुष्ठरोगाचे निमूर्लन म्हणजेच संपूर्ण उच्चाटन झालेले नाही. तेव्हा हे उच्चाटन करण्यासाठी 2015 पासून पुन्हा कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात आल्या. या मोहीमेत आढळलेल्या रुग्णांना एमटीडी उपचार देण्यात येतात. Latur News: बांगड्यातही लातूर पॅटर्न, अवघ्या 10 रुपयांपासून मिळतो सेट, असं मार्केट पाहिलंय कधी? Video लातूर शहरात कुष्ठरोग बाधित रुग्णांची वसाहत लातूर शहरातील विवेकानंद चौक परिसरामध्ये महात्मा गांधी कुष्ठधाम वसाहत आहे. यात 500 ते 700 कुष्ठरोग बाधित रुग्ण एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. सक्षम संस्थेमार्फत या रुग्णांसाठी वेळोवेळी मेडिकल कॅम्पचे आयोजन केले जाते. तसेच त्यांना लागणारी आवश्यक ती कागदपत्रे शासन स्तरावरून मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. नुकतेच डॉक्टर शिवाजी काळगे यांनी रुग्णांच्या डोळ्यांचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले असून यासाठी सक्षम मार्फत मदत केली गेली.