ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 29 मे: संगीत आणि नृत्याची बहुतेक सर्वांनाच आवड असते. मनोरंजनासाठी अनेकजण विविध शैलीतील नृत्याविष्कार आवर्जून पाहत असतात. नृत्य कला सादर करणं तसं आव्हानात्मक असून त्यासाठी शारीरिक सदृढताही तितकीच गरजेची असते. तरीही एखादी व्यक्ती जास्तीत जास्त किती वेळ नृत्य करेल असं आपल्याला वाटतं? जर कुणी 126 तास सलग नृत्याविष्कार सादर करणार आहे, असं तुम्हाला सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. पण लातूरची कन्या हे आव्हान पेलणार आहे. अकरावीत शिकणारी सृष्टी सुधीर जगताप ही विद्यार्थिनी या विश्वविक्रमासाठी सज्ज झाली आहे. नेपाळचा विक्रम मोडीत काढणार सध्या सर्वाधिक काळ नृत्याचा विश्वविक्रम नेपाळच्या नावावर आहे. हा विक्रम मोडीत काढून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाला अनमोल भेट देण्याचा निश्चय सृष्टीनं केलाय. त्यासाठी ती पाच दिवस, पाच रात्री आणि सहा तास म्हणजेच सलग 126 तास नृत्य सादर करणार आहे. लातूरच्या दयानंद सभागृह येथे 29 मे पासून ती नृत्यास सुरुवात करणार आहे. 3 जून पर्यंत हा नृत्याचा अविष्कार सुरू राहणार आहे.
चौदा महिन्यांपासून सराव सृष्टी देशाला जागतिक विक्रमाची भेट देण्यासाठी अपार कष्ट घेत आहे. गेल्या तेरा ते चौदा महिन्यांपासून तिचा नृत्याचा सराव सुरू आहे. नेपाळकडे असणारा जागतिक विक्रम कोणत्याही स्थितीत जिंकून भारताच्या नावे करायचा आहे. त्यासाठी मी सर्व ते प्रयत्न करणार आहे, असे सृष्टी सांगते. गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्डसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. तिच्या नृत्य विश्वविक्रमाचे परीक्षण गिनीज बुक यंत्रणे कडूनच होणार आहे. दरम्यान तिला दयानंद संस्थेने सहा दिवसांसाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. सृष्टीचा सलग लावणीचाही विक्रम सृष्टी जगताप हिनं यापूर्वी सगल 24 तास लावणी सादर करण्याचा विक्रम केला. याची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. सृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या कल्चरल ओलंपियाड साठी भारताचे नेतृत्व केले होते. त्यासाठी ती हाँगकाँग आणि दुबई येथील उत्सवात सहभागी झाली होती. यापूर्वी सृष्टीने राज्य आणि देश पातळीवर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. वाहिन्यांवरील नृत्य स्पर्धांमध्ये महाविजेतेपद पटकाविले आहे. वडील सुतारकाम करतात, डोक्यावर कर्ज पण रात्रशाळेत शिकत तिने मिळवला पहिला नंबर, पाहा Video वयाच्या अडीच वर्षांपासून करतेय नृत्य वयाच्या अडीच वर्षापासून तिला नृत्य सादर करण्याची आवड निर्माण झाली. यामुळे विविध नृत्य कला तिला अवगत झाल्या असून अवघ्या वयाच्या पंधराव्या वर्षी ती कथ्थक विशारद झाली आहे. उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता आणि कुशल नृत्य कौशल्य असलेल्या सृष्टीच्या कुटुंबीयांनी तिला भक्कम साथ दिली आहे. सृष्टी सध्या लातूरमधील दयानंद महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत शिकत आहे. दहावी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेत तिला 99.2 टक्के गुण मिळाले. तिला युपीएससी परीक्षेतून सनदी सेवेमध्ये जायचं आहे.