साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर 22 जून : आपल्या जनावरांना घरातील एका सदस्याप्रमाणे वाढवणे ही प्रत्येक शेतकऱ्याची खासियत असते. त्याचं जनावराशी नातं इतकं घट्ट असतं की तो त्याच्या प्रत्येक सुख-दु:खातही सहभागी होतो. कोल्हापूरच्या एका शेतकऱ्यानं त्याच्या लाडक्या गायीच्या डोहाळे जेवणाचा खास कार्यक्रम केला. का केला कार्यक्रम? किसन माने असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ते कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील असणाऱ्या हुपरी गावात राहतात. त्यांची वडीलोपार्जित शेती आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना जनावरांच्याबद्दल आपसूकच प्रेम आणि जिव्हाळा आहे. तसेच त्यांना स्वतःला देखील गाई पाळण्याची आवड असल्यामुळे त्यांच्याकडे असणाऱ्या गायींची ते अगदी प्रेमाने काळजी घेतात. त्यांच्याकडे असणाऱ्या गायींपैकीच एक गाय म्हणजे गौरी. तिच्या डोहाळे जेवण आणि ओटी भरण्याचा मोठा कार्यक्रम नुकताच गावात पार पडला. त्याची सध्या गावात चर्चा सुरू आहे.
किसन माने यांनी गौरी गायीचा मुलीप्रमाणे सांभाळ केला आहे. लहानपणी बाळाला जसे दूध पाजले जाते, अगदी त्याचप्रमाणे गौरीला देखील त्यांनी बाटलीनं दूध पाजलंय. संपूर्ण माने कुटुंबीयांना गौरीचा लळा लागलाय. त्यामुळे तिच्या बाळंतणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं होतं. कसा झाला कार्यक्रम? सध्या गौरीचे वय हे तीन वर्ष असून ती नऊ महिन्यांची गाभण आहे. घरातील सदस्यासारखं गौरीचे डोहाळे जेवण करण्यात आले होते. आपल्या घरच्या मुलीचेच डोहाळे जेवण समजून माने यांनी सर्व कार्यक्रम केला. या कार्यक्रमासाठी आपले नातेवाईक, मित्रमंडळी आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वांना त्यांनी आमंत्रण दिले होते. हिंदू धर्मात गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे अशा गायीच्या डोहाळे जेवण कार्यक्रमाला देखील महिलावर्गही मोठ्या उत्साहानं सहभागी झाला होता. शिवाजी महाराजांमुळे बदललं केरळी तरुणाचं आयुष्य, नवं मिशन समजल्यानंतर कराल मुजरा कार्यक्रमाला जमलेल्या महिलांनी गौरीला ओवाळून तिचे औक्षण करत ओटी भरली. यावेळी गौरीला अंघोळ घालून सुंदररित्या सजवण्यात आले होते. दारात रांगोळीही काढण्यात आली होती. माने कुटुंबियांनी उपस्थितांनी स्नेह भोजनाची देखील व्यवस्था केली होती. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेकडो महिला आणि पुरुषांनी हा अनोखा गायीच्या डोहाळे जेवण आणि ओटी भरण्याच्या कार्यक्रम या अनुभवला. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा आणि माने कुटुंबीयांचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.