नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 6 मार्च : रोजगार हा देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्यापैकी एक आहे. आजही अनेक तरुण शिक्षण घेऊन देखील नोकरी नसल्यामुळे निराश झाल्याचे आपण नेहमी पाहतो. मात्र, जालन्यातील दोन भावंडांनी शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे न धावता स्वतः चा नर्सरी व्यवसाय सुरू करून आर्थिक प्रगती साधलीय. त्याच बरोबर गावातील तब्बल 11 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कशी झाली सुरूवात? जालन्यातील वाटूर मधील रहिवाशी असलेल्या गजानन नरहरी माने यांनी बीएससी अॅग्रीचे शिक्षण घेतलेले आहे. तर त्यांचे छोटे बंधू राजेश नरहरी माने वय डीटीएड केलेले आहे. गजानन माने यांनी काही दिवस देऊळ गाव राजा येथील एक सीड्स कंपनीत काम केले. तिथे त्यांना दर्जेदार बियाणे निर्मिती विषयी बरीच माहिती मिळाली. याच ज्ञानाचा वापर त्यांनी नोकरी सोडून स्वतः च्या व्यवसायासाठी केला आहे.
कोणती रोपे मिळतात? सुरुवातीला त्यांनी 20 गुंठ्यांत छोटीशी नर्सरी सुरू केली. या नर्सरीतून ते शेतकऱ्यांना भाजी पाल्याची रोपे पुरवायचे. हळूहळू त्यांचा या व्यवसायात जम बसला. भाड्याच्या जागेवर नर्सरी असल्याने काही मर्यादा येऊ लागल्या. म्हणून त्यांनी 85 लाखांत दोन एकर जमीन घेतली व इथे भव्य अशी सोहम हायटेक नर्सरी सुरू केली. या नर्सरीमध्ये मिरची, कोबी, बैंगन, सिमला मिरची, टरबूज, खरबूज, सिताफळ, जांभळ, शेवगा अशी अनेक प्रकारचे दर्जेदार रोपे उपलब्ध आहेत.
Success Story : 2 वेळा जेवणाची होती भ्रांत! सातवी पास तरुण ‘या’ शेतीच्या जोरावर झाला कोट्यधीश, Video
11 जणांना रोजगार उपलब्ध दोन एकरच्या नेट सेट मधून उत्तम दर्जाचे रोपे संगोपन करून विक्री व डिलिव्हरी करून आठ ते दहा जिल्ह्यांमध्ये पाठवली जातात. दररोज दहा ते पंधरा हजार रोपांची घरपोच विक्री केली जाते. यामधून वर्षाकाठी 70 ते 80 लाख रुपयांची रोप विक्री होते. खर्च वजा जाता वर्षाला 20 ते 25 लाखांची बचत होते. तसेच या दोन एकरच्या नेट शेडमध्ये 5 महिला 6 पुरुष असे एकूण 11 कामगार काम करतात. यामुळे गावातीलच 11 जणांना गावातच रोजगार उपलब्ध झालाय, अशी माहिती सोहम हायटेक नर्सरीचे मालक गजानन माने यांनी दिली.