नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 13 एप्रिल : कोणत्याही स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण कौशल्यांचा कस लागतो. प्रत्येक जागेसाठी हजारो दावेदार असतात. या सर्वांना मागं सारत यश मिळवायचं असेल तर जिद्द आणि चिकाटी आवश्यक असते. या दोन गोष्टींच्या जोरावर अनेक अडथळे पार करता येतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या वन विभागाच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या परीक्षेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश हे प्रेरणा देणारं आहे, शेतकऱ्याची लेक वनाधिकारी जालना जिल्ह्यातील सोनाली शेषराव इंगळे या शेतकऱ्याच्या लेकीची रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवड झालीय.शिरजगावच्या शेतकऱ्याच्या या लेकीनं अनेक अडचणींवर मात करत हे यश मिळवलंय.या निवडीनंतर गावकऱ्यांकडून तिचा खास सत्कारही करण्यात आला.
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन राजपत्रित अधिकारी झालेल्या सोनालीचे पाचवीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव वाघरूळ या ठिकाणी झाले. त्यानंतर त्यांनी नवोदय विद्यालयात बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्या नेट-सेट परीक्षाही उत्तीर्ण झाल्या. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. कोरोना काळात या नोकरीवर त्यांना पाणी सोडावं लागलं. त्याचकाळात आई-वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं. दिवगंत वडिलांचं स्वप्न पूर्ण! आईच्या कष्टाचं चीज करत मोना राज्यात तिसरी, पाहा Video या प्रवासात त्यांना त्यांच्या पतीची भक्कम साथ मिळाल्याचे सोनाली इंगळे सांगतात.फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी कमवा आणि शिका या योजेअंतर्गत स्वतः चा खर्च भागवला.त्यानंतरही पैशांची अडचण भासू लागली तेव्हा सोनालीच्या आईन स्वतः चे दागिने गहाण ठेवले.पण तिचे शिक्षण थांबू दिले नाहीत. सोनालीच्या वडिलांकडे केवळ साडेतीन एकर कोरडवाहू जमीन आहे. एका साधारण शेतकऱ्याच्या मुलीने घेतलेली ही झेप कौतुकास्पद अशीच आहे. ‘खेडेगावात जे विद्यार्थी शिकतात त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांना देखील माझ्यासारखं यश शिखर गाठवण्यासाठी मदत करावी,’ अशा भावना सोनालीने व्यक्त केल्या. या पदावर रुजू झाल्यानंतर मी योग्य ती सेवा करून नव तरुणांना देखील मार्गदर्शन करणार आहे, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.