नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 1 जून : शालेय शिक्षण घेताना अनेकांच्या मनात इंग्रजीची भीती निर्माण होते. या भीतीमुळेच अनेक विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचं टाळतात. त्याचा भविष्यात त्यांना पश्चातापही होतो. पण तरीही कुणी या शाखेतून परीक्षा देण्यास धजावत नाही. पण, जालना जिल्ह्यातील तरुणानं तब्बल 12 वर्षांनी पुन्हा एकदा विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली. ही परीक्षा तो फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्णही झालाय. का दिली परीक्षा ? भगवान मोरे असं या तरूणाचं नाव असून ते जालना जिल्ह्यातल्या खादगावचे रहिवाश आहे. 2008 साली ते दहावी उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांनी आर्ट्स शाखेत प्रवेश घेतला. पण, पुढच्या वर्षी ते अकरावीमध्येच नापास झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा तयारी केली. त्यामुळे 2011 साली आर्ट्स शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले.
बारा वर्षांपूर्वी डीएडची मोठी क्रेझ होती. मोरे यांनीही डीएडला प्रवेश घेतला. त्यांनी काही वर्ष खासगी शाळेत शिक्षकाची नोकरीही केली. त्यानंतर तुटपुंज्या पगारावर काम करावं लागत असल्यानं त्यांनी ती नोकरी सोडली. मोरे सध्या जालनामधील एका खासगी कंपनीत काम करतात. सलाम तिच्या जिद्दीला! घर, नोकरी सांभाळून 38 व्या वर्षी बारावी पास, Video ‘आपण विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालो असतो, तर आणखी चांगल्या संधी मिळाल्या असत्या ही सल त्यांना बोचत होती. त्यामुळे त्यांनी शहरातील दान कुंवर महाविद्यालयात प्रवेश घेतला. नुकत्याच झालेल्या 12 वी च्या परीक्षेत त्यांना 64 टक्के मार्क्स मिळाले आहेत. विज्ञान शाखेतील शिक्षणामुळे चांगली संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करणार असल्याचा निर्धार मोरे यांनी बोलून दाखवला.