नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 9 मार्च : कांदा उत्पादक शेतकरी मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे अडचणीत असतानाच टोमॅटो उत्पादक शेतकरी देखील हतबल झाला आहे. बाजारात टोमॅटोला केवळ 2 रुपये किलो दर मिळत असल्याने झालेला खर्च निघणे देखील कठीण झालं आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील तानाजी लटके या शेतकऱ्याने 2 एकरातील टोमॅटो पिकात जनावरे सोडली आहेत. अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील शेतकरी तानाजी लटके यांना एकूण 4 एकर जमीन आहे. ऑक्टोबरमध्ये त्यांनी 2 एकर टोमॅटो लागवड केली होती. परंतु गेल्या दोन तीन महिन्यांपासून बाजारात टोमॅटोला अपेक्षित भाव नाही. त्यात इतर सर्व भाजीपाल्यांप्रमाणे बाजारात टोमॅटो आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
जनावरे सोडली त्यामुळे टोमॅटो जालना, औरंगाबाद मार्केटला नेण्यासाठी मजूर महीलांचा कॅरेटसह तोडणी खर्च व वाहन भाडेही वसूल होत नसल्यामुळे वारंवार खिशातून वाहनभाडे द्यावे लागत आहे. यामुळे दहीपुरी येथील शेतकरी तानाजी लटके यांनी वैतागून चक्क कष्टाने पिकविलेले उभे असलेले टोमॅटोचे सर्व पिक समूळ उपटून बांधावर फेकले. तसेच भरल्या पिकांत जनावरे चरायला सोडून दिली. टॉमेटोचा सडा शेतावर टॉमेटोचा अक्षरशः सडा साचलेला आहे. बहूतांशी शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्याने पिके घरात साठऊन ठेवलेली आहेत. आणी आता त्यासाठी पर्याय म्हणून वांगे, टॉमेटो, गोबी, भेंडी, चवळी, कोथिंबीर, कांदा, मेथीसह इतर पिकांच्या लागवडीकडे वळले होते. मात्र आता सर्वच भाजीपाल्यांना कवडीमोल भाव मिळत असल्याने प्रचंड उत्पादन खर्च करूनही हताश होऊन पाणावलेल्या डोळ्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या हाताने पीकांना नाईलाजाने उध्वस्त करावे लागत आहे.
Beed News: अवकाळी पावसानं आणलं डोळ्यात पाणी, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला! Photos
उपटून फेकायची वेळ आली ऑक्टोबर महिन्यात टॉमेटोच्या रोपांची प्रति रोप 140 रुपये विकत घेऊन लागवड केली होती. यासाठी 2 लाख रुपये खर्च आला होता. पीक तयार करायला 6 महीने राबायचं. तसेच सर्व उद्योग धंद्याला सकाळी लाईट पण शेतकऱ्यांना मात्र रात्रीच्या वेळी लाईट शेतात काट्या, साप, विंचू, रानडुकरांच्या दहशतीत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत पीकाला पाणी द्यायचं पीक तयार झालं की बाजार कोसळलेला. उत्पादन खर्च सोडाच, पण शेतातून मार्केट पर्यंत माल घेऊन जाण्याचा खर्च सुद्धा निघत नाही. लेकरांप्रमाणे जीव लावलेल्या टॉमेटोना उपटून फेकायची वेळ आली. त्यात आता मुलींचे लग्न, तसेच खते, कीटकनाशके, बियाणांची उधारी, पाहूण्यांची उसणवारी बँकेचे कर्ज कसे फेडायचे हीच चिंता आहे, असे टोमॅटो उत्पादक शेतकरी तानाजी लटके यांनी सांगितले.