नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 27 एप्रिल: हिंदू धर्मात विवाह हा 16 संस्कारपैकी एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. विवाहाबाबत समाजात जात, धर्मनिहाय विभिन्न प्रथा, परंपरा आहेत. एखाद्या महिलेच्या पतीचे अकाली निधन झाल्यास तिला आयुष्यभर विधवा म्हणून जीवन जगावं लागतं. अनेक सामाजिक, मानसिक, धार्मिक समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र, जालना जिल्ह्यातील एका तरुणानं वेगळा सामाजिक आदर्श घालून दिला आहे. आपल्या मोठ्या भावाचा अपघाती मृत्यूनंतर दिलीप प्रेमसिंग कटारे या तरुणानं दोन मुलांसह वहिनीला स्वीकारत विवाह केला आहे. कटारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर जालना जिल्ह्यातील बदनापूरपासून 30 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी लालवाडी वस्ती आहे. गावातील भीमसिंग प्रेमसिंग कटारे यांचा 24 फेब्रुवारी 2023 रोजी अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कटारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. भीमसिंग यांची पत्नी मधुमालती यांच्यावरील पतीचे छत्र हरवले. त्यांची दोन वर्ष व साडेतीन वर्षे वयाची दोन मुले वडिलांच्या मायेला पोरकी झाली.
विधवा वहिनीसोबत केलं लग्न भीमसिंह यांच्या मृत्यूनंतर पत्नी मधुमालती आणि मुलांचे काय? असा प्रश्न उभा होता. तेव्हा भीमसिंग यांचा लहान भाऊ दिलीप कटारे हा अविवाहित होता. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मधुमालती व दिलीप यांचा विवाह लावण्याबाबत मुलींच्या माहेरच्या लोकांशी चर्चा केली. या विवाहाला नातेवाइकांसह दिलीप व मधुमालती यांनी संमती दिली. त्यानंतर हा विवाह सोहळा गावातील देवीच्या मंदिरात संपन्न झाला. नवा सामाजिक आदर्श देशात विधवांच्या पुनर्विवाहासाठी अनेक समाजसुधारकांनी काम केले. ऐन तारुण्यात विधवा झालेल्या मुलींचे प्रश्न गंभीर असतात. त्यांना आधाराची गरज असते. विधवा म्हणून जगताना त्यांना सामाजिक हेटाळणीला सामोरं जावं लागतं. त्यात एकटीनं मुलांची जबाबदारी पेलणं अवघड असतं. अशा काळात दिलीप कटारे यांनी विधवा वहिनीचा मुलांसह स्वीकार केला. ही घटना वेगळा सामाजिक आदर्श निर्माण करणारी आहे. Success Story : मुलगी आहे म्हणून बँकेची कर्ज देण्यास टाळाटाळ, आज तीच बनली राज्याची आदर्श सर्वांच्या संमतीने पार पडला विवाह भीमसिंग कटारे यांच्या अपघाती निधनानंतर दोन मुलं आणि आई उन्हात पडल्या. पुढे त्यांचं कसे होईल अशी चिंता सगळ्यांना सतावत होती. गावातील लोकांनी मधूमालती यांच्या माहेरी चर्चा करून दिलीप यांच्याशी तिचा विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. सगळ्यांच्या संमतीने हा विवाह पार पडल्याचे गावकरी लाल सिंग सुलाने यांनी सांगितले. मुलांचा विचार करून केलं लग्न पती भीमसिंग कटारे यांचं दोन महिन्यापूर्वी अपघातात निधन झालं. यांनतर मला माझ्या दोन मुलांची काळजी वाटत होती. माझी आई खूप गरीब आहे. सगळ्यांच्या विचाराने मी लग्न केलं. आता आधार वाटतोय पण वाईटही वाटतं, असं नवविवाहिता मधूमालती यांनी सांगितलं. तर भावाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही मुलं अनाथ झाली होती. त्याचा विचार करून मी हा निर्णय घेतला, असे दिलीप कटारे यांनी सांगितले.