नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 8 मार्च : राज्यातील अतिमागास जिल्ह्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी मानव विकास मिशन लाखो रुपये खर्च करते. अतिमागास जिल्ह्यांमध्ये जालना जिल्ह्याचा समावेश असल्याने जिल्ह्यात देखील विविध उपक्रम राबविले जातात. या मिशनच्या सहकार्याने परतूर तालुक्यातील खांडवी वडी येथील 30 महिलांनी एकत्र येत निंबोळीवर प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. कडुनिंबाच्या निंबोळी पासून इथे सेंद्रिय खत आणि निंबोळी तेलाची निर्मिती केली जात आहे. मानव विकास मिशनचे सहकार्य आणि महिलांच्या प्रयत्नामुळे कडू निंबोळीने या महिलांच्या संसारात गोडवा पेरण्याचे काम केले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त काय आहे या महिलांच्या संघर्षाची कहाणी पाहूया. कशी झाली सुरुवात? परतूर तालुक्यातील खांडवी वाडी येथील संगीता पवार या निंबोळी खरेदी करायच्या. या व्यवसायात त्यांना फारसा नफा मिळत नव्हता. महिला बचत गटामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांनीच समन्वयक असलेल्या मंगल साखळकर यांना आम्हाला निंबोळी वर काहीतरी प्रोजेक्ट देण्याची विनंती केली. साखळकर यांनी महिलांची अडचण लक्षात घेऊन पाठपुरावा केला. परतूर कार्यालयातील व्यवस्थापक शैलेश साखळकर यांनी या कामात या सगळ्यांना मदत केली. मानव विकास मिशने या उद्योगासाठी तब्बल 40 लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले अन् या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
या महिला मागणीनुसार आणि प्रत्येकीच्या सोयीनुसार कारखान्यात काम करतात. शेतातील कामे करून आल्यानंतर देखील हे काम करता येते. यामुळे महिलांना स्वतः च्या खर्चासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी देखील मदत होत आहे. दर वर्षी या कारखान्यातून महिलांना 3 ते 4 लाखांचा नफा होतो. हा नफा या महिला आपसात वाटून घेतात. उत्पादित झालेली उत्पादने विकण्यासाठी विविध शहरात या समूहाने दुकाने सुरू केली आहेत. या दुकानांमधून सेंद्रिय खत आणि निंबोळी तेलाची विक्री केली जाते. काय आहे किंमत? निंबोळी खत हे मुख्य उत्पादन जास्त विकले जाते. त्याची 1 किलो पासून 3 किलो पर्यंत पॅकिंग करण्यात आली असून त्याची किंमत 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहे. तेलाचे मागणी नुसार उत्पादन घेतले जाते.
उद्योग भरभराटीला मानव विकास मिशनच्या पुढाकाराने सुरू झालेला हा उद्योग आता चांगलाच भरभराटीला आला आहे. निंबोळी पासून सेंद्रिय खत आणि निंबोळी तेलानंतर आता या महिला निंबोळी अर्क तयार करण्यावर काम करत आहेत. ग्रामीण भागात तब्बल 30 महिलांनी एकत्र येत एक उद्योग उभारणे आणि तो सक्षपणे चालवणे आव्हानात्मक होते. मात्र, या महिलांनी ते आव्हान स्वीकारले आणि आज त्या सक्षमपणे कुटुंबाला हातभार लावत आहेत.