Mumbai: People carry a huge Ganesh idol on the occasion of 'Maghi Ganesh Utsav', at Chinchpokli, in Mumbai, Sunday, Feb. 03, 2019. (PTI Photo)(PTI2_3_2019_000142B)
लक्ष्मण घाटोळ, नाशिक 21 ऑगस्ट : यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांवर पोलीस पोलिसांची करडी नजर असणार आहे. काही अटी शर्तींवर गणेश मंडळांना पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून परवानग्या देण्यात येणार असून DJ वर यंदा देखील बंदी असणार आहे. त्याच बरोबर गणेशउत्सवासाठी जबरदस्तीने वर्गणी गोळा करणाऱ्यांना पोलीस कार्यवाई ला सामोरे जावे लागणार आहे. दरवर्षी गणेशोत्सव काळात गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. अनेक मंडळांकडून निरनिराळे देखावे सादर करण्यात येत असतात. सर्वच गणेश मंडळांकडून वर्गणी देखील गोळा करण्यात येते मात्र आता अश्या पद्धतीने वर्गणी गोळा करणाऱ्यांना चॅरिटी कमिशनर ची परवानगी घ्यावी लागणार असल्याचं नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी संगीतलंय.
गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशांचे कुठल्याही गणेश मंडळाकडून उल्लंघन होऊ नये यासाठी नाशिक पोलीस आणि मनपा प्रशासनाच्या वतीने एक खिडकी योजने अंतर्गत गणेश मंडळांना परवानग्या देण्यात येणार आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या आता पोलीस बैठका घेत असून त्यांना ह्या काळात न्यायालयाच्या आदेशांचे पालन अटी शर्ती आणि ह्या काळात सामाजिक तेढ वाढू नये, तसेच बाळगावयाची काळजी यासाठी सूचना करत आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात कुठल्याही समाजाची भावना दुखावल्या जाईल अशा देखाव्यांवर पोलिसांकडून बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच बरोबर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात अनेक मंडळांकडून वर्गणी गोळा करण्यात येते परंतु कुठल्याही ठिकाणी जबरदस्तीने वर्गणी गोळा करतानाची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळे यंदाचा सार्वजनिक गणेश उत्सव हा शांततेत आज उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी बाळगत असून सर्व गणेश मंडळांनी देखील आपल्याला सहकार्य करावे असं आवाहन पोलिसांनी केलंय.