अहमदनगर, 12 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्याजागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या महिन्यात मुंबईत आले होते तेव्हाच त्यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती. छत्रपती शिवाजी महाराज तसंच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या विधानांमुळे कोश्यारी वादात सापडले, यानंतर त्यांना दिलगिरीही व्यक्त करावी लागली. 2019 साली झालेला देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी, त्यानंतर आलेलं महाविकासआघाडी सरकार, राज्यपालनियुक्त 12 आमदारांची रखडलेली नियुक्ती, कोरोना काळात प्राथर्नास्थळं उघडण्याबाबत उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र आणि सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी, महाराष्ट्राच्या राजकारणातले मोठे उलटफेर कोश्यारी राज्यपाल असताना घडले. भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा एक किस्सा सांगितला आहे. उद्धव ठाकरेंचा राजीनामा स्वीकारण्यासाठी कोश्यारी रात्री 10.30 वाजेपर्यंत जागे होते. यासाठी त्यांनी जी तत्परता दाखवली ती जनतेच्या लक्षात राहणारी होती, असा टोला नीलम गोऱ्हे यांनी लगावला. ‘राज्यपालांवर काही बोलू नये असा प्रघात आहे, पण ते महाराष्ट्राचा प्रश्न सोडून इतर विषयांवर इतकं बोलले आहेत की आम्हालाही त्यांच्यावर बोलणं भाग आहे,’ असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. राज्यपालांची जी निवड झाली होती, ती त्यावेळेला सरकारला योग्य वाटली म्हणून झाली होती, परंतू आता त्यांची मुदत संपण्याच्या आधीच त्यांचा राजीनामा स्वीकारला गेलेला आहे. महापुरुषांच्याबद्दल निराधार निंदनीय आणि ज्याप्रकारे त्यांचा अवमान होईल, अशी त्यांनी अनेक विधान केली. ते राज्यपाल असल्यामुळे त्यांच्याबद्दल अक्षरशः लोकप्रतिनिधींची तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी परिस्थिती झाली. त्याच्याबद्दलची नाराजी अनेकांनी व्यक्त केली, पण तरी देखील त्यांनी बरेचसे संकेत देखील मोडले, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. आता नवीन जे राज्यपाल येतील त्यांनी सर्व पक्षांना योग्य संधी आणि न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका बजवावी, हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा राहील, अशी प्रतिक्रियाही नीलम गोऱ्हे यांनी दिली.