मुंबई 19 एप्रिल : देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रसार झपाट्यानं होत आहे. मागील चोवीस तासात देशात 2.73 लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. कोरोनानं देशातील जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये हातपाय पसरले आहेत. मात्र, यातही महाराष्ट्रातील (Maharashtra Cases in Maharashtra) परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनाच्या आकडेवारीनुसार राज्यात प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. राज्यात मागील चोवीस तासात कोरोनाचे 68,631 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांची संख्या 68 हजाराहून अधिक नोंदवली गेली आहे. नवीन रुग्णसंख्या समोर आल्यानंतर राज्यातील आतापर्यंतच्या बाधितांची एकूण संख्या 38 लाख 39 हजार 338 झाली आहे. नवीन रुग्णसंख्येसोबत मृतांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. प्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू राज्यात रविवारी 503 जणांनी जीव गमावला आहे. यानंतर राज्यातील आतापर्यंतच्या मृतांची संख्या 60 हजार पार झाली आहे. नवी रुग्णसंख्येतील 8 हजार 468 रुग्ण हे मुंबईतील आहेत. केवळ मुंबईमध्येच आतापर्यंत 12 हजार 354 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. यातील 53 मृत्यू रविवारी झाले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्यानं वाढत असल्यानं इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांबाबत कडक नियम करण्याची तयारी सुरू आहे. प्रसार रोखण्यासाठी रविवारी दिल्लीसह सात राज्य संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये केरळ, गोवा, गुजरात, दिल्ली, राजस्थान आणि उत्तराखंडचा समावेश आहे. आदेशानुसार, या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाआधी 48 तासापूर्वी करण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक आहे.