लंडन 19 एप्रिल : जगभरात कोरोनाविरोधात (Coronavirus) लढा देण्यासाठी लसीकरण (Corona Vaccination) मोहिम राबवली जात आहे. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अनेकजणांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचं समोर येत आहे. मात्र, अशा लोकांवर विषाणूचा प्रभाव कमी दिसतो. अशात आता ही लस अधिक प्रभावी बनवण्यासाठी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं (Oxford University) नव्यानं तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत अशा लोकांच्या शरीरामध्ये जिवंत विषाणू सोडले जातील, जे याआधीच कोरोनातून बरे झाले आहेत. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनंच एस्ट्राजेनेकासोबत मिळून कोरोना लस तयार केली आहे, याला भारतात कोविशिल्ड या नावानं ओळखलं जातं. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना 64 स्वयंसेवकांची गरज आहे, जे याआधीच कोरोनातून बरे झाले आहेत. या लोकांचं वय 18-30 इतकं असावं. युनिर्व्हसिटीच्या म्हणण्यानुसार, या सर्व लोकांच्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा वुहान स्ट्रेन सोडला जाईल. 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्येच आढळला होता. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, ज्या 64 लोकांच्या शरीरामध्ये हा स्ट्रेन दुसऱ्यांदा टाकला जाईल त्यांना 17 दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येईल. काही महिन्यातच या अभ्यासाचा रिपोर्ट येईल, असं म्हटलं जात आहे. यामुळे शास्त्रज्ञांना आणखी प्रभावी लस बनवण्यास मदत होईल. याशिवाय हेदेखील माहिती होईल, की किती दिवसांनंतर एखाद्या रुग्णला पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते. नुकतंच एका रिसर्चमधून असं समोर आलं आहे, की 10 टक्के वयस्कर लोकांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होत आहे. ऑक्सफोर्डनं सांगितलं, की या संशोधनाच्या माध्यमातून याचा अभ्यास केला जाईल, की एखादा व्यक्ती साधारण किती दिवसांनंतर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकतो. या अभ्यासाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णांच्या वेगवेगळ्या समुहांवर हा प्रयोग केला जाईल आणि त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीबाबत अभ्यास करण्यात येईल. जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे, की दुसऱ्यांदा एखाद्याच्या शरीरात विषाणू सोडल्यानं धोका वाढू शकतो. याचा शरीरावर दिर्घकालीन परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.