सातारा, 3 नोव्हेंबर : पश्चिम महाराष्ट्रात ज्यांच्या राजकीय शत्रुत्वाची नेहमीच चर्चा होते असे दोन मोठे नेते आता एकत्र येणार आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे कट्टर विरोधक विरोध संपवून पहिल्यांदाच एका व्यासपीठावर दिसणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत कराडमध्ये शुक्रवारी दुपारी तीन वाजता हा मेळावा होणार आहे. मेळाव्यात या दोन्ही नेत्यांच्या मनोमिलना वर शिक्कामोर्तब होणार असून नव्या राजकीय पर्वाला सुरुवात होणार आहे. या मनोमिलनाने काँग्रेसचे सातारा जिल्ह्यातील दोन कट्टर विरोधक गट एक होणार असल्याने काँग्रेसला बळकटी मिळणार आहे. कोरोनामुळे काही मोजक्याच महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. हेही वाचा - साताऱ्याचा शेतकरी अमेरिकन महिलेच्या प्रेमात पडला आणि वाट लागली, 40 लाख रुपये गमावले दरम्यान, एकाच पक्षात असूनही या दोन गटांतील मतभेदांमुळे साताऱ्यात काँग्रेसची ताकद कमी झाली होती. चव्हाण आणि उंडाळकर या दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नाही, अशी स्थिती पाहायला मिळत. मात्र हे मतभेद विसरून दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.