बारावीच्या परीक्षेत हस्ताक्षर घोटाळा
छत्रपती संभाजीनगर, 20 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालक वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. परीक्षेत गैरप्रकार घडू नयेत यासाठी बोर्डाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे. बारावीच्या एका विषयाच्या साडेतीनशेहून अधिक उत्तर पत्रिकांमध्ये एकसारखं हस्ताक्षर आढळलं आहे. यामुळे खळबळ उडाली असून महाराष्ट्रा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बुचकळ्यात पडलं आहे. बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचं हस्ताक्षर असल्याचं आढळलं आहे. या सर्व उत्तरपत्रिका बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येतेय. शिक्षण मंडळाकडून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना विमान सेवेत नोकरीची संधी; डीजीसीएकडून `या` पदासाठी भरती सुरू परीक्षा झाल्यानंतर आता निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. पण पेपर तपासणी करत असताना ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांबाबत संशय निर्माण झाला. एकाच उत्तरपत्रिकेत दोन वेगवेगळी हस्ताक्षरे असल्यानं याबाबत शिक्षण मंडळाला कळवण्यात आलं. जेव्हा शिक्षण मंडळाने चौकशी समिती स्थापन केली तेव्हा अशा उत्तरपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. तसंच नोटीस पाठवून संबंधितांना चौकशीला बोलावलं गेलं. या चौकशीत विद्यार्थ्यांसह केंद्रप्रमुखांचाही समावेश होता. शिक्षण मंडळाने केलेल्या चौकशीनंतर जेव्हा अहवाल समोर आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. ३७२ हून अधिक उत्तरपत्रिकांमध्ये अर्धवट राहिलेली उत्तरे एकाच व्यक्तीने लिहिली असल्याचं समोर आलंय. पण हे हस्ताक्षर नक्की कोणाचं आहे हा प्रश्न कायम आहे. चौकशी अहवालातून उघडकीस आलेल्या या हस्ताक्षर घोटाळ्याने शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांनी चौकशीवेळी हे हस्ताक्षर आपलं नाही अशी माहिती दिलीय. त्यामुळे आता हा प्रकार कोणत्या केंद्रावर झाला, कुणी केला, उत्तरपत्रिका कधी जमा करण्यात आल्या असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या घोटाळ्यामुळे पर्यवेक्षक ते मॉडरेटर यांच्यापर्यंत सर्वांकडे संशयाची सुई आहे. कोणत्या केंद्रावरून हा प्रकार घडला? तसंच उत्तरपत्रिका बाहेर देण्यात आल्या होत्या का? दोन जिल्ह्यात घडलंय की इतर कुठे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.