संग्रहीत छायाचित्र
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 15 जून : आज राज्यभरात शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा केल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांचे वाजतगाजत पहिल्या दिवशी स्वागत झाले. मुलेही झालेलं स्वागत पाहून भारावून गेली. संभाजीनगर महापालिका शाळेतील विद्यार्थी मात्र थोडे कमनशिबी ठरले. स्वागत तर दूर त्यांना पहिला दिवस झाडाखालीच सुरू करावा लागला. काय आहे प्रकरण? राजा बाजार भागातील संभाजीनगर महापालिकेची मराठी शाळा आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत शाळा स्मार्ट डिजीटल केली जाणार होती. त्यामुळे शाळेच्या खोल्या पाडण्यात आल्या. सुट्टी दरम्यान शाळा बांधली जाणार असा अंदाज मनपा प्रशासनाने बांधला. मात्र, कंत्राटदाराने बांधकाम केलेच नाही. आजपासून शाळा सुरू झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांना वर्गच नसल्याने त्यांना चक्का शाळेतील बोळात झाडाखाली बसावे लागले. वाचा - शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी अन् पालकांवर आंदोलनाची वेळ, गेटवर खाल्ला टिफिन स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या निधीतून महापालिकेच्या 71 पैकी 50 शाळांची दुरुस्तीचे काम सुरू झाले. सुमारे 347 वर्गखोल्या डिजीटल करण्याचे ठरले. परंतु, शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच अद्याप पुनर्बांधणीसाठी पाडण्यात आलेल्या शाळांच्या छताचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी जमिनीवर चटई टाकून शाळा भरवण्याची वेळ आली आहे. एका शिक्षकाने तर खोल्या असल्याचा तकलादू दावाच केला. ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या डोक्यावर छत नाही वर्गच नसल्याची खंत विद्यार्थ्यांना नव्हती. शाळा सुरू झाल्याच्या आनंदात चिमुरड्यांना आपल्या मित्रांसोबत जिथे जागा मिळेल तिथे खिचडीचा आस्वाद घेतला. शेवटी मनपा मुख्य अभियंता देशमुख यांनी मान्य केले. मार्चमध्येच वर्ग बांधले गेले पाहिजे होते. येत्या काही दिवसात वर्ग खोल्या तयार असतील, असा दावाही त्यांनी केला आहे. महापालिकेचा डिजीटल शाळा खोल्याबद्दल योजना खूप चांगली आहे. डिजीटल वर्गाचा फायदा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. काही खोल्या डिजीटल झाल्यासुद्धा आहेत. आता पावसाळा सुरू होतोय. काही शाळांना वर्गच नाहीत. त्यामुळे डिजीटल तर सोडा साधी खोली नसल्याचे विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली आहे.