छत्रपती संभाजीनगर, 16, जुलै : आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमवस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरु होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे. दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय. या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतिक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणार्या महिन्याची सुरूवात होते. पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीपअमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते.
कशी करावी दिव्याची पूजा? सर्वप्रथम घरातील सर्व दिवे काढावेत. गरम पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून साफसफाई करावे. त्यानंतर स्वच्छ पुसावे. देवासमोर एक पाट मांडून त्या भोवती छान रांगोळी काढावी. पाटावरती सर्व दिवे मांडावे. त्या सर्व दिव्यांची हळद-कुंकू गुलाल वाहून पूजा करावी. फुलं वस्त्रमाळ हे दिव्यांवरती व्हावं. नंतर हे सर्व दिवे हे पेटवावेत. त्यांना हात जोडून नमस्कार करावा. जावई आमचा गुणी, धोंड्याच्या महिन्यात काय द्यायचं गिफ्ट? हा VIDEO पाहाच दिव्याची पूजा केल्यावर काय फायदा होतो? दिव्याची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते. त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लाभते. तसेच आपल्या वरती सदैव महालक्ष्मीची कृपाही राहते. आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार व ज्ञानरूपी प्रकाश आपला आयुष्यात यावा यासाठी या दिव्यांची पूजा आपण करायला पाहिजे, असं आचार्य श्रीराम धानोरकर सांगतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)