(अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत स्फोट)
गणेश गायकवाड, प्रतिनिधी अंबरनाथ, 10 जून : मुंबई जवळील अंबरनाथ एमआयडीसीमधून मोठी बातमी समोर आली आहे. वडोल एमआयडीसी परिसरामध्ये ब्लु जेट हेल्थ केअर या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याने कंपनीला भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेमध्ये एका जणाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास एमआयडीसी परिसरामध्ये ब्लु जेट हेल्थ केअर या केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर कंपनीमध्ये एकच आगडोंब उसळला. अवघ्या काही क्षणात आगीनं रौद्ररुप धारण केलं. आग इतकी भीषण होती की, दूरपर्यंत धुराचे लोट दिसून येत होते. कंपनीत आग लागल्यानंतर कामगारांनी बाहेर धाव घेतली.
या परिसरात दूरपर्यंत केमिकल हवेत पसरलं होतं. केमिकल आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने नागरिकांना डोळ्यांची जळजळ आणि श्वास घ्यायला त्रास होत आहे. या दुर्घटनेमध्ये एका जणाचा श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे. तर 4 कामगार गंभीर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Dharashiv News : बंद बोअरमधून अचानक उडाला 50 फूट पाण्याचा फवारा; धाराशिवमधला ‘हा’ व्हिडीओ पाहिलात का?) सध्या कंपनीमधून पिवळ्या रंगाचा धूर बाहेर पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. स्फोट झाल्यानंतर परिसरामध्ये काम करणाऱ्या केमिकल कंपन्यांमधील कर्मचारी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावपळ करत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या दाखल झाल्या आहेत. पण परिसरात केमिकल हवेत पसरल्यामुळे त्यांना देखील केमिकलमुळे त्रास होत आहे. सध्या मास्क वापरून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कंपनीला आग कशामुळे लागली आणि आगीचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेले नाही. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.