सत्तेत एकत्र मात्र स्थानिक पातळीवर धुसपूस
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 16 जुलै : राज्याच्या राजकारणात सत्तेत एकत्र असले तरी बीडच्या आष्टी तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारात चांगलीच जुंपली आहे. भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्यात खुंटेफळ साठवण तलावावरून आरोप प्रत्यारोपाचे राजकारण चांगलेच तापले आहे. यानिमित्ताने भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजप-राष्ट्रवादीत जुंपली बीडच्या आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावावरून राष्ट्रवादीचे विधानसभेचे आमदार बाळासाहेब आजबे आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्यात श्रेय वाद आणि आरोप प्रत्यारोपावरून चांगलीच धूसपुस सुरू झाली आहे. खुंटेफळ साठवण तलावात नातेवाईकांच्या नावाने जमीन खरेदी करून शासनाला चढ्या दराने विक्री केल्याचा आरोप बाळासाहेब आजबे यांनी केला आहे. विशेष म्हणजे सुरेश धस यांच्या मामाच्या मुलाच्या नावाने साठवण तलावाच्या क्षेत्रातील जमीन खरेदी केल्याचा आरोप देखील बाळासाहेब आजबे यांनी केला आहे. तर यावर सुरेश धस यांनी आव्हान देत जर आमच्या नातेवाइकांच्या नावावर एक गुंठाही जमीन असेल तर आमच्या कुटुंबातील एकही व्यक्ती विधानसभा लढवणार नाही, असे प्रतिआव्हान आजबे यांनी दिलंय. मात्र, यावर बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषद घेत थेट सुरेश धस यांचे मामा आणि भाचे यांनी जमिनी खरेदी केलेले हे घ्या पुरावे म्हणत सर्व पुरावे पत्रकार परिषदेत मांडले. खुंटेफळ साठवण तलावात महेश नवनाथ शिंदे, गणेश नवनाथ शिंदे (मामाची मुले), नवनाथ बापूराव शिंदे (मामा अन् मोहन हौसराव झांबरे यांच्या नावावर जमीन आहे, हे कुणाचे नातेवाईक आहेत. हे मलाच नाही तर पूर्ण तालुक्याला माहीत आहे. सुरेश धस यांनी मला जास्त तोंड उघडायला देऊ नये असे देखील आज मी म्हणाले. वाचा - एसटी अपघाताची मालिका सुरूच; मुंबई-गोवा महामार्गावर बसचा भीषण अपघात या पत्रकार परिषदेला उत्तर देत सुरेश धस यांनी हल्ला चढवला. साठवण तलावा होऊ न देण्यासाठी बाळासाहेब आजबे कट कारस्थान करत असल्याचा आरोप केला. स्थानिक स्वराज्य मतदार संघातील निवडणुका भारतीय जनता पार्टी शिंदे गट स्वतंत्रपणे लढणार आहोत, असे सांगून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटाशी आम्ही युती करणार नाही असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. साठवण तलावावरून या दोन आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन एकमेकांच्या आरोपांचे खंडन केले. दरम्यान, राज्यात जरी भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र आली असली तरी आष्टीत मात्र विरोध कायम असल्याचे दिसत आहे. म्हणजे दोन्ही आमदार 2024 निवडणुकींसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. खुंटेफळ साठवण तलावाच्या कामावरून सध्या आष्टीत राजकीय कलगीतुरा रंगला आहे.