रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 5 एप्रिल: आधुनिक काळामध्ये शहरापासून ते गाव खेड्यात राहणाऱ्या नागरिकांच्या हातामध्ये स्मार्टफोन आला. मधल्या काळात इंटरनेट मोफत मिळाले आणि अनेकांना ऑनलाईन गेम, ऑनलाईन व्हिडिओ पाहण्याची सवय लागली. या सवयीचे रुपांतर व्यसनात झाले आणि अनेकजण या व्यसनाच्या विळख्यात अडकत गेले. सध्या मोबाईल आणि इंटरनेटसाठी शेकडो रुपये खर्चून तासनतास मोबाईलवर अनेकजण राहत आहेत. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर हा मानसिक आजार झाल असून त्यावर वेळीच उपचार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मोबाईलचा अतिवापर एक मानसिक आजार कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती स्मार्टफोन आले. अनेकांनी अभ्यासासाठी या स्मार्टफोनचा वापर केला. या माध्यमातून ऑनलाइन क्लासेस देखील सुरू झाले. मात्र तेव्हापासून अनेक तरुणांना मोबाईलची सवय लागली. त्यातच इंटरनेटच्या विळख्यात अडकत गेलेल्या तरुणाईचा मोबाईलचा वापर व्यसनात बदलला. आता मोबाईलचा अतिवापर हा एक मानसिक आजार झाला असून अनेकजण या आजाराने ग्रस्त आहेत.
बीड जिल्ह्यातील तरुणाई मोबाईलच्या विळख्यात बीड जिल्ह्यातही मोबाईलचा अतिवापर या व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील तरुणाई या विळख्यात सर्वाधिक अडकली आहे. लहान मुले आणि प्रौढही या व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे त्यांच्यात विविध आजारही उद्भवू लागले आहेत. बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात मानसोपचार केंद्रामध्ये मोबाईलच्या अधिक वापरामुळे त्रस्त झालेले अनेक रुग्ण येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना 24 तासातील 14 ते 16 तास मोबाईल वापरण्याच्या सवयी देखील लागल्याचे बीडमधील मानसोपचार तज्ज्ञ मोहम्मद मुजाहिद यांनी सांगितले. मोबाईलच्या अतिवापराने निर्माण होणाऱ्या समस्या मोबाईलचा अतिवापर मानसिक आजाराला आमंत्रण देतो. मोबाईल आणि इंटरनेट सर्फिंगवर तासनतास घालवले जातात. वेळेचे भान राहत नाही. तसेच सातत्याने स्वभावामध्ये चिडचिड होते. वेळेत मोबाईल जर भेटला नाही तर घबराट होते. यातच मणक्याचे विकार डोळ्यांचे आजार होत असल्याच्या गोष्टी समोर आल्या आहेत. महाराष्ट्र दिनी मिळणार मोठी भेट, 147 मेडिकल टेस्ट होणार मोफत! धोका टाळण्यासाठी वेळीच रोखा आपला पाल्य आतापासूनच मोबाईलचा अधिक वापर करत असेल तर त्याला वेळीच रोखणे गरजेचे आहे. कामाशिवाय मोबाईलमध्ये इंटरनेटचा अधिक वापर केला जात असेल तर तो वेळीच रोखण्याचा प्रयत्न करा. मोबाईलपासून मुलांना शक्य तेवढे दूर ठेवून त्यांना मैदानी खेळ आणि इतर गोष्टींत गुंतवून ठेवा. एखादा मुलगा मोबाईलसाठी चिडचिड करत असेल तर वेळीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असा सल्ला बीडमधील मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.