सांकेतिक छायाचित्र
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 10 जुलै : बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अवघ्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच दारूड्या तरुणाने अत्याचार केला. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली. आरोपीने पीडितेच्या आई-वडिलांना सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगर गाठले. त्यानंतर शहराजवळीलच एका डोंगरात नेऊन तिचा गर्भपात केला. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगू नये, यासाठी पीडितेच्या आई-वडिलांना धमक्या देत गावातून बाहेर काढले. या सर्व प्रकरणाची बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने गर्भपातासह मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काय आहे प्रकरण? गावातील तरुणाने दिव्यांग कुटुंबातील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केला. जीवे मारण्याची धमकी देत सतत अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती राहिली. पोटात दुखू लागल्याने आई-वडिलांनी सोनोग्राफी केली असता धक्कादायक गोष्ट समोर आली. पीडिता 7 महिन्याची गर्भवती होती. विश्वासात घेऊन सर्व काही विचारलं असता. त्या बाबतीत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. यावेळी वडिलांनी आरोपीला फोन केला असता धमकी देऊन आई-वडिल आणि मुलीला घेऊन संभाजीनगर येथे रस्त्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये आणले. येथे मुलीला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारू अशी धमकी देऊन आई-वडिलांना पुण्याला पाठवून दिले. पीडितेच्या चुलत भावाने तक्रार केल्याने हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणासह गर्भपात करणारे व मदत करणाऱ्या 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दिव्यांग कुटुंब भितीचे छायेत दिव्यांग कुटुंबाबाबतीत घडलेला प्रकार ऐकल्यावर अंगावर शहारे येतील. आरोपींनी आम्हाला दमदाटी करून धमकी देत चारचाकी गाडीमध्ये बसून संभाजीनगरला नेले. तिथे पत्राच्या शेडमध्ये दबाव टाकून तिला गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर रात्रभर मुलीला त्रास होत होता. दुसऱ्या दिवशी दुपारी डिलिव्हरी झाली. त्यात मुलगी झाली पण ती मयत होती. पाटीखाली झाकून ठेवली. आमच्या जीवाला धोका आहे असं सांगितलं. माझ्या मुलीवर खूप मोठा अन्याय झाला आहे. आता आम्हालासुद्धा मारण्याची धमकी दिली जात असून त्यांची भावकी आणि मित्रपरिवार मोठा आहे. कधीही आम्हाला मारून टाकतील, अशी भीती वाटते असं पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं. वाचा - मेहुण्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध; बायकोने मुलासोबत रचला कट अन्.. नाशिक पुन्हा हादरलं या प्रकरणात चाईल्ड लाईनने महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणात तत्त्वशील कांबळे यांनी मुलीचा शोध घेतला. त्या मुलीच्या संदर्भात जे घडलं ते माणुसकीला काळीमा फासणार आहे. ज्या ठिकाणी त्या मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या सर्व ठिकाणाची चौकशी करून तसेच गर्भपाताचे यात मोठे रॅकेट आहे का? याची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केला. तक्रार केल्यानंतर लगेच कारवाई केली असती तर एक जीव वाचला असता. त्यामुळे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर ती कारवाई करावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या सदस्य एडवोकेट संगीता चव्हाण यांनी सांगितलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानुसार तपासाची कारवाई सुरू आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली. महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे पुन्हा एकदा अवैध गर्भपात करणारी टोळी सक्रिय आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी नराधम आरोपी रणजित शिवदास शेंडगे याच्यासह त्याला साथ देणारा भाऊ पवन शिवदास शेंडगे, जालिंदर खामकर, योगेश शेंडगे यासह 14 जणांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार, पोस्कोसह अन्य कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.