लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 10 जुलै : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, तसेच अत्याचाराच्या घटना घडत आहेत. नाशिक शहरात तर खुनाचे सत्रच सुरू असल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांत वारंवार खुनाच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात पुन्हा समोर आली आहे. बायकोने मुलाच्या साहाय्याने नवऱ्याला अनैतिक संबंधाच्या संशयातून डोक्यात मुसळी घालून संपवलं आहे. काय आहे प्रकरण? पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर नगर भागामध्ये समृद्धी हाइट्स या बिल्डिंगमध्ये राहणारे दादाजी पोपट गवळी (वय 41) यांची त्यांचा मुलगा विशाल आणि बायको सुनिता गवळी यांनी डोक्यात मुसळी घालून हत्या केल्याचे समोर आलंय. दादाजी गवळी यांचे त्यांच्याच मेहुण्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा पत्नी सुनीता आणि मुलगा विशाल यांना संशय होता. यावरून त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. दादाजी गवळी हे गाढ झोपेमध्ये असताना सुरुवातीला सुनीता व विशाल यांनी त्यांना गळफास लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, झटापटीमध्ये मुलाने त्यांचे पाय धरून ठेवले व पत्नीने गवळी यांच्या डोक्यात थेट मुसळी घालून त्यांची निर्दयीपणे हत्या केली. या घटनेनंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. वाचा - सासू-सुनेचं कडाक्याचं झालं भांडण; सुनेनं रागाच्या भरात खाल्ल्या ‘त्या’ गोळ्या, दीड तासांच्या उपचारांनंतर… भोंदूगिरीतून महिलेची निर्घृण हत्या नाशिक रस्त्याजवळील शिंदे गावात एका महिलेच्या हत्येची घटना समोर आली आहे. येथील शिवरत्ननगर भागात राहत असलेल्या जनाबाई भिवाजी बर्डे असे हत्या झालेल्या मांत्रिक महिलेचे नाव आहे. निकेश दादाजी पवार असे तिची हत्या करणाऱ्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. जनाबाई बर्डे ही महिला नाशिकजवळील शिंदे गावात राहत्या घरात देवाची गादी चालवत होती. ही गादी चालविताना जनाबाई बर्डे तिच्याकडे येणाऱ्या पीडितांचे निवारणासाठी उपाय सुचविण्यासोबत, त्यांना भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांवर मार्ग सुचवित, त्यांच्या अडचणी निवारणासाठी तोडगा सांगत असल्याने, तिच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणांहून नागरिक येत होते. दरम्यान परिसरातील नागरिकांमध्ये जनाबाई बर्डे या दैवी शक्तीने उपचार व उपाय करीत असल्याचा समज असल्याने आजूबाजूच्या परिसरातील पीडित तिच्याकडे उपायांसाठी येत असत. याच पीडितांमधील संशयित निकेश दादाजी पवार हाही एक होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या समस्येवर दैवी मार्गाने उपाय करण्यासाठी जनाबाई यांच्याकडे येत होता. मात्र, त्याला जनाबाईने सांगितलेल्या उपायाचा काहीही फायदा झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तो मागील काही दिवसांपासून रागात होता. यातून ही हत्याचे झाल्याचा संशय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.