बीड, 4 जानेवारी : मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतत असताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातामध्ये मुंडे यांच्या छातीला किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबत मुंडे यांनीच माहिती दिली. दरम्यान या अपघातानंतर आता मुंडे यांना खबरदारी म्हणून उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. थोड्याच वेळात मुंडे यांना परळी वरून लातूर मार्गे विमानाने मुंबईला उपचारासाठी नेलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
छातीला मार माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाहनाचा मध्यरात्री परळी शहरात अपघात झाला. यात धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थीर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र खबरदारी म्हणून धनंजय मुंडे यांना उपचारासाठी मुंबई येथील ब्रिच कँडी हॉस्पिटलला घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्तींकडून देण्यात आली आहे. या अपघातामध्ये मुंडे यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे.
प्रकृतीबाबत मुंडेंकडून खुलासा दरम्यान अपघात झाल्यानंतर फेसबुक पोस्ट करत मुंडे यांनी स्वत:च आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. परळीला परतत असताना माझा अपघात झाला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्यचं मुंडे यांनी म्हटलं आहे. या अपघातामध्ये माझ्या छातीला किरकोळ दुखापत झाली आहे, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून, आफवांवर विश्वास ठेवू नका असं मुंडे यांनी म्हटलं.