सांकेतिक छायाचित्र
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 5 मे : राज्यात बालविवाहाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. यात सर्वाधिक बालविवाह बीड जिल्ह्यात होत असल्याच समोर आलं आहे. असे असताना बीडच्या आष्टी तालुक्यातील तहसीलदार, बीडीओ, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांना याचं कोणतचं सोयर सुतक नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात काल (4 मे) दोन बालविवाह रोखण्यात आले होते. मात्र, दुपारी रोखलेला एक बालविवाह सायंकाळी मोठ्या थाटामाटात मंगल कार्यालयात झाल्याचं चाईल्ड लाईन सदस्य तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे याचे फोटो तत्त्वशील कांबळे यांनी संबंधित धामणगावचे सायबर नामक ग्रामसेवक, त्याचबरोबर संबंधित अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना पाठवले. मात्र, पोलीस प्रशासनाने ग्रामसेवकांना तक्रार द्यायला पाठवा, आम्ही गुन्हा दाखल करून घेतो म्हणाले. तर ग्रामसेवक या प्रकरणात आम्ही दुपारी बालविवाह रोखले आहेत, नोटीस दिली आहे. मात्र, नंतर काय झालं हे माहित नाही, असं म्हणत तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनकडे होती. यामुळे गेल्या चार दिवसांपासून चाईल्ड लाईन सदस्य तत्त्वशील कांबळे यांनी आष्टीचे तहसीलदार विनोद गुंडमवार, यांना जवळपास 40 फोन केले. मात्र, एकाही फोनचे उत्तर गुंडमवार यांनी दिले नाही. तर बीडीओ सुधाकर मुंडे यांना अनेक वेळा कॉल केला. मात्र, त्यांनी देखील काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याचबरोबर विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकही कारवाई करायला टाळाटाळ करत आहेत, असा आरोप चाइल्डलाईन सदस्य तत्त्वशील कांबळे यांनी केला. वाचा - चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या गुप्तांगाला हिटरचे चटके, स्वतःच्या मुलींसमोरच.. दरम्यान राज्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह होत आहेत. या बालविवाहामुळे अल्पवयीन मुलींना एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे हे होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या मोहीम हाती घेतंय. मात्र, तालुका पातळीवर असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचेच या होणाऱ्या बालविवाहांना पाठबळ आहे, असं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली, तरचं ही बालविवाहाची समस्या कमी होऊ शकेल. अन्यथा बालविवाहाची संख्या आणखी वाढू शकते.