बीड, 13 जुलै: सध्याच्या काळात सुशिक्षित बेरोजगारी वाढल्याचं बोललं जातं. पण बीडमधील एका भरतीतून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. अवघे साडेपाच हजार मानधन असणाऱ्या नोकरीसाठी चक्क एमएससी ऍग्री, डीएड, बीएड आणि इंजिनिअरिंग झालेल्या उमेद्वारांनी अर्ज केले आहेत. बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदनीसच्या 555 पदांसाठी ही भरती होत असून तब्बल 4557 अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती कार्यक्रम अधिकारी चंद्रशेखर केकान यांनी दिली. अंगणवाडीतील विविध पदांसाठी भरती बीड जिल्ह्यातील अंगणवाडीच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडीत सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडीच्या 555 पदांसाठी भरती होत आहे. यासाठी प्रकल्पांतर्गत अंगणवाडी क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असणाऱ्या व शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी बारावी पास ही शैक्षणिक अर्हता आहे.
उच्च शिक्षित मुलींच्या अर्जांचे प्रमाण अधिक उमेदवारांच्या शिक्षणावर त्यांच्या नोकरीची योग्यता ठरत असते. यासह उच्चशिक्षित असेल तर त्यानुसार त्याला महिन्याकाठी मानधन मिळावे अशी अपेक्षा असते. मात्र, बीडमधील अंगणवाडीच्या 555 पदांसाठी आतापर्यंत 4557 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये उच्च शिक्षित एमएससी ऍग्री, डीएड, बीएड आणि इंजिनिअरिंग झालेल्या मुली आणि महिलांचे अर्ज आहेत. विशेष म्हणजे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता केवळ 12 वी पास आणि साडेपाच हजार मानधन आहे. 4557 अर्जांपैकी 1145 अर्ज हे उच्च शिक्षित मुलींचे आहेत. हे प्रमाण 25 टक्क्यांच्या घरात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यावरून बीड जिल्ह्यातील बेरोजगारीचा दर पुन्हा एकदा समोर आल्याचे बोलले जात आहे. Success Story: प्रतीकच्या कष्टाचं झालं चीज! आजोबांच्या पश्चात केली इच्छा पूर्ण अंगणवाडी मदतनिसांचे काम काय? पोषण आहार शिजवणे, पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, लसीकरणासाठी बालकांची नोंदणी घेणे, अंगणवाडीतील लाभार्थी बालक मातांना आवश्यक मदत करणे, तसेच अंगणवाडी सेविकेला सर्व कामात मदत करणे, या स्वरूपाची कामे अंगणवाडी मदतनीसला करावी लागतात. मात्र यामध्ये जेवढ्या प्रमाणात उच्चशिक्षित मुलींनी अर्ज केले आहेत त्या जर या पदासाठी पात्र झाल्या तर वरील काम त्यांना करावे लागणार आहे.