संग्रहित छायाचित्र
संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती, 20 जून : राज्याच्या शिक्षण विभागात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. बदली प्रक्रियेतून सूट मिळावी यासाठी अनेक शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र व बनावट घटस्फोटाचे दाखले दिल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघटनेचे महेश ठाकरे यांनी केला होता. यानंतर अमरावती विभागातील जिल्हा परिषदेतील यूआयडी धारक व दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या सर्व शिक्षकांची यवतमाळ येथील मेडीकल बोर्डाकडून वैद्यकीय तपासणीचे आदेश विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता तपासणी झाल्यास अनेक शिक्षकांचे बिंग फुटणार आहे. अमरावती जिल्ह्यासह यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला या जिल्ह्यात जवळपास 2500 शिक्षक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्वांची चौकशी करून दोषी शिक्षकावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. शिक्षकांनी काढले बोगस प्रमाणपत्र अमरावती जिल्ह्यातील 412 शिक्षकांना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडीकल बोर्डाकडे प्रमाणपत्र तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी दिली. मेडीकल बोर्डाकडून प्रमाणपत्र बनावट आढळल्यास शिक्षकांवर गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती सुद्धा शिक्षणाधिकारी यांनी दिली. आमदार बच्चू कडू यांचा इशारा येत्या तीन ते चार महिन्यात दिव्यांग मंत्रालयामार्फत हे बनावट कर्मचारी शोधण्यासाठी अभियान राबवले जाणार आहे, ज्या शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्र आधारे शासकीय नोकरीत लाभ घेतला असेल त्यांनी आपले प्रमाणपत्र सरेंडर करावे अन्यथा त्यांच्यावर फौजदार कारवाई केल्या जाईल तसेच त्यांना नोकरीतून काढण्यात येईल, अशी तंबी आमदार व दिव्यांग कल्याण अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिली आहे. वाचा - ‘या सरकारमध्ये ती क्षमता नाही..’ मंत्रीमंडळ विस्ताराव आमदार बच्चू कडू स्पष्टच बोलले काही महिला शिक्षकांनी घटस्फोट झाल्याचे प्रमाणपत्र दाखवले व त्यानंतर लगेच प्रसूती रजा देखील उपभोगली. अनेक शिक्षकांनी पॅरालीसीस असल्याचे प्रमाणपत्र दाखवले. त्याचवेळी ते ड्रायव्हिंग करत असल्याचे देखील निदर्शनास आलं. अनेकांनी मेंदूच्या आजाराचे व कर्णबधिर असल्याचे बोगस प्रमाणपत्र विभागाकडे सादर करून शासकीय योजनेचा फायदा घेतला तसेच या दिव्यांग शिक्षकांनी आयकरात सुद्धा सूट मिळवली आहे. या शिक्षकांची मेडीकल बोर्डाकडून चौकशी झाल्यास बीड जिल्हा परिषदे प्रमाणेच अमरावती विभागातही अनेक शिक्षकांचे बोगस प्रमाणपत्र पुढे येणार आहे.