मुंबई, 26 फेब्रुवारी : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा देशावर कोरोनाचं सावट असल्या कारणानं सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्यावर निर्बंध आणले आहेत. दरम्यान मुंबई पोलिसांनी सार्वजनिक कार्यक्रमाची परवानगी नाकारली असतानाही मनसेचे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी उद्या मराठी भाषा दिन कोरोनाच्या नियमांचं पालन करत साजरी केली जाईल, असं आव्हान मुंबई पोलिसांना दिलं आहे. यासंदर्भात अमेय खोपकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणाले की, महाराष्ट्राचे एक मंत्री संजय राठोड यांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत गर्दी जमा केली, जेव्हा सरकारने कारवाई का केली नाही? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व नियमांचे पालन करून हा दिवस साजरा करणार होतो, त्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र मनसेकडून साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा दिनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या मागे हा कार्यक्रम करण्यासाठी मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी परवानगी मागितली होती.
हे ही वाचा- महाराष्ट्रात Lockdown होणार का? मंत्र्यांनी केला मोठा खुलासा मराठी कलाकारांबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठी स्वाक्षरी कार्यक्रमासाठी परवानगी मागण्यात आली होती. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असल्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही असं पोलिसांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. सोबतच्या पत्रात तरीही कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर समर्थकांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. काय म्हणाले संदीप देशपांडे - आम्ही मराठी भाषा कार्यक्रम करणार होतो आणि करणार आहोतच. यांच्यात संजय राठोडावर कारवाई करण्याची हिम्मत नाही. हे काय करणार? पोलीस ना काय करायचे ते करू दे, आम्ही मराठी भाषा दिवस साजरा करणारच. मराठी भाषा दिवसासाठी सगळे नियम आहेत का? संजय राठोडांसाठी नियम नाही का? काँग्रेसच्या मेळाव्यासाठी, पदयात्रेसाठी नियम नाही का? गुजराथी मेळावे घेतले तेव्हा त्यांना नियम नव्हते का? संपूर्ण मुंबईचं नाही तर महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रम करणार आहोत. ज्याला जे करायचं आहे ते करा.