राष्ट्रपतीचं महाराष्ट्रातील आचाऱ्याला निमंत्रण
अहमदनगर, 28 जुलै, हरिष दिमोटे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील मराठमोळ्या जेवणाची भूरळ पडली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शिर्डीच्या दौऱ्यावर आल्या होत्या. साईदर्शनासाठी शिर्डीत आलेल्या राष्ट्रपतींनी आता थेट मराठमोळं जेवण बनवणाऱ्या साईप्रसादालयातील दोन आचाऱ्यांना राष्ट्रपती भवनात बोलावलं आहे. हे दोन्ही आचारी आता काही दिवस राष्ट्रपतींसाठी जेवण बनवणार आहेत. 7 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साई दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासाठी साईसंस्थानच्या प्रसादालयात खास मराठमोळं जेवण बनवण्यात आलं होतं. मटकी, मेथीची भाजी, आलूजीरा, बटाटा वडा, साधं वरण भात अशा प्रकारचं मराठमोळं जेवण बनवण्यात आलं होतं. अतीशय आवडीने राष्ट्रपतींनी या जेवणाचा आस्वाद घेतला. मात्र राष्ट्रपतींना हे जेवण इतकं आवडलं की त्यांनी आता थेट त्यांच्यासाठी जेवण तयार करणाऱ्या साईप्रसादालयातील त्या दोन आचाऱ्यांना राष्ट्रपती भवनात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. राष्ट्रपतींकडून हे निमंत्रण साई मंदिराला पाठवण्यात आलं आहे. राष्ट्रपतींचं निमंत्रण आल्यानं आता हे दोन्ही आचारी उद्या दिल्लाला रवाना होणार आहेत.