भाजप नेते किरीट सोमय्या
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहमदनगर, 7 जून : लव्ह जिहाद प्रकरणातील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज अहमदनगर दौऱ्यावर आले होते. त्यांनी सात पीडित कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची बैठक घेतली. त्यावेळेस त्यांनी अशा प्रकरणातील महिलांच्या तक्रारी आल्या तर त्यांच्यामध्ये अधिक संवेदनशीलता दाखवावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. विशेष करून 13 ते 22 या वयातील मुलींच्या तक्रारी गांभीर्याने घ्याव्यात आणि त्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या पीडित कुटुंबांना आर्थिक मदतही कशी देता येईल, यावरही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. हा संपूर्ण अहवाल ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहेत. यावेळी आयएसआय सारख्या संघटना काही समाजकंटकांना पाठिंबा देत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. एकीकडे राज्यात लव्ह जिहाद सारख्या गंभीर घटना घडत होत्या तर दुसरीकडे हिंदूंच्या भावना ऐकून घेतल्या जात नव्हत्या. त्यामुळे राज्यात हिंदुत्ववादी पक्षाचे सरकार आल्यामुळे त्यांना आपल्या भावना समजून घेणारं सरकार आल्यामुळे हे प्रकरण पुढे येत आहेत. यापूर्वी राज्यात हिरवट सरकार होतं. उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा हाती घेतला होता तर काँग्रेस राष्ट्रवादी मतं मिळवण्यासाठी मुस्लिमांना खुश करण्यात मग्न होते, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. वाचा - Sharad Pawar : मी शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार, शरद पवार यांचं वक्तव्य औरंगजेबाचे फलक झळकले अहमदनगर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी मिरवणुकीत औरंगजेबाचे फलक झळकले होते. यावर बोलताना सोमय्या म्हणाले देशाबाहेरून ज्या संघटना आहेत, आयएसआय किंवा बाहेरील देशाच्या गुप्तचर संघटना अशा लोकांना पाठींबा देत असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांची मंचरमध्येही भेट कथित लव्ह जिहाद प्रकरणाच्या माहिती घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या मंचरमध्ये आले होते. पीडित मुलीची नातेवाईकांची भेट घेऊन सोमय्या मंचर पोलीस स्टेशनला दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांच्या आजपर्यंतच्या कारवाईचा आढावा घेतल्याची माहिती आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, हिंदू समाजात पण जागरूकता येऊ लागली आहे, हे खपवून घेतलं जाणार नाही. 32 महिने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं. त्यांनी अशा प्रवृत्तींना थेट प्रोत्साहन दिलं. त्यामुळे हे वाढलं आहे. शिंदे फडणवीस सरकारने मात्र अशा प्रवृत्ती चालून घेणार नाही. या देशात जय औरंगजेब म्हणणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करणार अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.