ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर
हरीश दिमोटे, शिर्डी शिर्डी, 26 फेब्रुवारी : पक्षांतर्गत बंडाळीमुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून संपूर्ण पक्ष गेला. मात्र, त्यानंतरही पक्षात अंतर्गत धुसफूस थांबण्याचं नाव घेतना दिसत नाही. ठाकरे गटाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या विरोधात ठाकरे गटाचेच शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बबनराव घोलप यांनी उत्तरनगर जिल्ह्यातील जुन्या पदाधिकाऱ्यांना हटवून त्या जागी केलेल्या नवीन नियुक्त्या मान्य नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आज राहाता येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोलप यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांना हटवण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटातील धुसफूस थांबणार का? चिन्ह गेलं, नाव गेलं अशा परिस्थितीत पक्ष अडचणीत असताना घोलप यांच्या मनमानी कारभारामुळे पक्षातच गटबाजी वाढली असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. बबनराव घोलप यांना हटवले नाही तर ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक खासदार कमी होईल असा इशाराच कार्यकर्त्यांनी दिला आहे. बबनराव हटाव, शिवसेना बचाव, अशा घोषणा देत उत्तर नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी घोलप यांच्या विरोधात आंदोलन केलं आहे. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे शिर्डी लोकसभेसंदर्भात काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
शिंदेंचं उरलेलं काम बबनराव घोलप करत आहेत; ठाकरे गटाची खदखद काही महिन्यांपूर्वी नाराज शिवसैनिकांनी विडंबनात्मक नाटिका सादर करत बबनराव घोलप यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. ठाकरे गटातील पदाधिकारी निवडीनंतर ठाकरे गटातील असंतोष बाहेर पडू लागला आहे. अकोले तालुक्यातील शिवसैनिकांनी बबन घोलपांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन केलं. तर कोपरगावातील शिवसैनिकांनी घोलप गो बॅकच्या घोषणा देत नाटिका सादर करत विडंबनात्मक आंदोलन केलं. जिल्हाप्रमुख प्रमोद लबडेंच्या नियुक्तीवर आक्षेप घेत पैसे घेऊन पद वाटल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. खरंतर, घोलप यांची शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला होता. परंतु, उत्तर नगरमधील पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटातील खदखद बाहेर पडत आहे. या प्रक्रियेत हाडामांसाच्या शिवसैनिकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप घोलप यांच्यावर होत आहे.ठाकरे गटातील या नाराजीचा फायदा येत्या काळात शिंदे गटाला मिळणार का? याकडे जिल्ह्याचं लक्ष आहे.