अहमदनगर भाजपमध्ये धुसफूस, राम शिंदेंच्या आरोपांना विखे पाटलांचं प्रत्युत्तर
हरिश दिमोटे, प्रतिनिधी शिर्डी, 17 मे : अहमदनगर जिल्ह्यातल्या भाजपमधला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून भाजप नेते राम शिंदे यांनी विखे पाटील पिता-पूत्रांवर राष्ट्रवादीसोबत छुपी युती केल्याचा आरोप केला, तसंच या सगळ्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे देणार असल्याचंही सांगितलं. राम शिंदे यांच्या या आरोपांवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केला आहे. राम शिंदेंनी जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींजवळ भूमिका मांडावी, त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. पक्षाच्या चौकटीत राहून यासंदर्भात चर्चा करण्याची आवश्यकता आहे, अशा वक्तव्यांनी विनाकारण कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. राम शिंदेंनी जाहीरपणे मत प्रदर्शन टाळलं पाहिजे, असा सल्लाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी राम शिंदेंना दिला आहे. भाजपमध्ये गटबाजी काहीही नाही, बाळासाहेब विखेंनी 40 वर्ष अहमदनगर जिल्ह्याचं नेतृत्व केलं, आमच्यावर पहिल्यापासून हेच आरोप झाले. या विषयावर अधिक भाष्य करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींसमोर शहानिशा झाली पाहिजे. भविष्यकाळात अस आरोप होऊ नयेत म्हणून पक्षामध्ये आचारसंहिता असावी, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. पवारांनंतर ठाकरेही भाकरी फिरवणार, मुंबईतले लोकसभा उमेदवार ठरले! राम शिंदेंचे आरोप काय? जामखेड बाजार समितीच्या सभापतीपद आमच्याकडेचे येईल असा विश्वास होता, मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधात काम केल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी केला आहे. या गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घातल्या असून याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाईल. विधानसभेतही विखेंनी विरोधात काम केलं होतं, आताही विरोधात काम केलं, असल्याचा गौप्यस्फोट राम शिंदे यांनी केला. एवढच नाही तर आमचा पक्ष भाजप आहे, काँग्रेस नाही, असा टोलाही राम शिंदे यांनी लगावला. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाव्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप यांना 9-9 अशा समसमान जागा मिळाल्याने या कृषी उत्पन्न बाजार समितीत आणखी चुरस वाढली होती. कुणाचाही सदस्य न फुटल्याने पुन्हा समान सदस्य झाले त्यानंतर ईश्वरचिठ्ठीने भाजपाचा सभापती तर राष्ट्रवादीचे उपसरपंच झाले. ‘पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्यांचा….’, शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितला पुढचा धोका!