आदित्य ठाकरे, आशिष शेलार
मुंबई, 17 जानेवारी : शिंदे गट आणि भाजपकडून सातत्यानं आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं आव्हान केलं होतं. त्यानंतर शिंदे गटाकडून प्रत्युत्तर म्हणून वरळीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. शिंदे गटानंतर आता भाजप देखील वरळी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर वरळीमध्ये भाजपकडून महाआरती करण्यात येणार आहे. याबाबत भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला देखील लगावला आहे. नेमकं काय म्हटलं शेलारांनी? आशिष शेलार यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला संध्या. ७ वा. वरळी नाक्यावर भव्य रंगमंच, ढोल,लेझीम,मावळे…५० कलावंतासह महाआरती! शिवप्रेमी वरळीकरांनो मोठ्या संख्येने सहभागी व्हा, छत्रपतींचा विसर पडलेल्या “वरळीतील पाहुण्यांना” ही घेऊन या!’ असं ट्विट शेलार यांनी केलं आहे.
शिंदे गटाचं शक्तिप्रदर्शन दरम्यान यापूर्वी शिंदे गटाकडून देखील आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना वरळीमधून निवडणूक लढण्याचे आव्हान केले होते. आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाकडून हे शक्तिप्रदर्शन करण्यात आलं होतं. आता त्यानंतर भाजपकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.