नवी दिल्ली, 23 जुलै : जपानी नागरिक चिकित्सक आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून कला साकारणारे असतात. त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल खूप चर्चा केल्या जातात. त्यांचा आहार, वर्तणूक, संस्कृती यातूनही खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अनेक जुन्या गोष्टी त्यांनी जपल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे काकेटसुगी (Kaketsugi Art) नावाची कला. ही कपडे रफू करण्याची कला आहे. सध्याच्या जमान्यात याचा फारसा कोणाला उपयोग वाटणार नाही; मात्र जपानी नागरिक त्या कलेचा अजूनही वापर करतात. सध्या कपड्यांमध्ये इतकी व्हरायटी आली आहे, की प्रत्येक प्रकारचा ड्रेस आपल्याला घ्यावासा वाटतो. अशानं कपाटं ओसंडून वाहतात; मात्र कपड्यांची हौस फिटत नाही. इतके कपडे असल्यावर फाटलेले कपडे ठेवायची गरजच काय? त्यामुळे कपडे रफू करण्याची पद्धत आता कमी होत चालली आहे. जपानमध्ये मात्र रफू करण्याची चक्क कला आहे आणि ती त्यांनी आजही जपून ठेवली आहे. या कलेला काकेटसुगी (Japanese Stitching Art) असं म्हणतात. आपण रफू केलेल्या जागी थोडासा पॅच दिसतो; मात्र जपानी काकेटसुगीमध्ये कापड अशा पद्धतीनं शिवलं जातं, की तिथे छिद्र पडलं होतं हे कळतही नाही. काकेटसुगी ही कपड्यांना रफू (Cloth Mending Technique) करण्याची जपानी कला आहे. यात फाटलेले, कापलेले कपडे पूर्ववत केले जातात. जपानमध्ये काकेटसुगी केलाच वापर करणारे अनेक नागरिक आहेत. ही प्रक्रिया खूप किचकट आणि वेळखाऊ असते; पण त्यामुळे फाटलेलं कापड नव्यासारखं वाटू लागतं. यात रफू करण्यासाठी कापडाचा छोटासा तुकडा त्या कापडामधून काढला जातो. जिथला तुकडा काढून कापडात काही फरक पडणार नाही, तिथलाच तुकडा काढला जातो. तो तुकडा ब्रश केला जातो आणि करून अॅसिटोनने धुतला जातो. त्यामुळे धागे सहजगत्या सुटे होतात. जेव्हा एक एक धागा वेगळा होतो, तेव्हा त्यांच्या साह्याने फाटलेल्या जागी शिवलं जातं. शिवल्यानंतर त्यावर इस्त्री फिरवली जाते. त्यामुळे ते पक्कं बसतं व छिद्र पडलेलं कळतही नाही. यू-ट्यूबवर काकेटसुगी या कलेबद्दल एक व्हिडिओ आहे. योशिको गोटो या यूट्यूब चॅनलवर काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यावर युझर्सनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यांनी त्या टेलरला सर्जनची उपाधी दिली होती. माणसांची नाही, तर कपड्यांची सर्जरी करणाऱ्या त्या टेलरनं सफाईदारपणे काकेटसुगी करून फाटलेलं कापड पूर्ववत केलं होतं. बदलत्या काळात अशा अनोख्या कला लुप्त होत चालल्या आहेत, अशी प्रतिक्रियाही काही जणांनी व्यक्त केली होती.
काही कपड्यांबाबत आपल्या आठवणी असतात किंवा काही कपडे खूपच आवडीचे असतात. त्यामुळे असे कपडे फेकून द्यायचं जिवावर येतं. काकेटसुगीसारख्या रफू कला कपडे नवे करण्याचं काम करतात. त्यामुळे कपड्यांसोबतच आठवणीही दीर्घ काळ स्मरणात राहू शकतात.