कोची, 23 सप्टेंबर : भारतीय नौदलाने (Indian navy) आता एक ऐतिहासिक पाऊल टाकलं आहे. पहिल्यांदाच युद्धनौकेवर दोन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या थेट युद्धनौकेवरून (Indian navy warship) हेलकॉप्टर उडवणार आहेत. सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी (Lieutenant Kumudini Tyagi) आणि सब लेफ्टनंट रिती सिंह (Lieutenant Riti Singh) यांनी ही झेप घेतलेली आहे आणि ही अभिमानास्पद बाब आहे. भारतीय नौदालाच्या इतिहासात प्रथमच दोन महिला युद्धनौकेवरील हेलिकॉप्टरच्या ताफ्यात रुजू होणार आहेत. ऑब्झर्व्हर म्हणून त्या काम करतील. प्रत्यक्षात युद्धनौकेवर हेलिकॉप्टर विभागात काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. या आधी जमिनीवरील नौदलाच्या तळांवर वैमानिक म्हणून महिला अधिकारी काम करत होत्या, पण युद्धनौकेवरील हेलिकॉप्टर विभागात कोणतीही महिला अधिकारी तैनात नव्हती. आता कुमुदिनी आणि रिती यांना ही संधी देण्यात आली आहे. अशी माहिती नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी दिली.
नुकतेच 17 अधिकारी नौदलाच्या सेवेत रुजू झाले त्यात लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रिती सिंह यांचा समावेश आहे. केरळमधील कोचीतील आयएनएस गरूड तळावर सोमवारी झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये नौदलातील चार तर तटरक्षक दलातील तीन महिलांचा समावेश होता़. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रशिक्षण विभागाचे प्रमुख रिअर अॅडमिरल अँटनी जॉर्ज होते. या 17 अधिकाऱ्यांनी ‘ऑब्झर्व्हर’चं शिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांना ‘विंग्ज’ प्रदान करण्यात आले. हे वाचा - असा शिक्षक होणे नाही! कोरोना महासाथीत विद्यार्थ्यांच्या दारासमोरचं आणली शाळा नौदलातील सर्व पदवीधरांचे अध्यक्षांनी अभिनंदन केलं. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं. अध्यक्षांनी क्वालिफाईड नेव्हिगेशन इंस्ट्रक्टर (QNI) म्हणून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या एका महिला अधिकाऱ्यासह सहा अधिकाऱ्यांचा सन्मानही केला़. त्यांना इन्स्ट्रक्टरचे बॅचही देण्यात आले.“हेलिकॉप्टर संचालनाचे महिलांनी पहिल्यांदाच प्रशिक्षण घेतलं आहे़. आता नौदलातील युद्धनौकांवरील त्यांच्या कामगिरीचा मार्ग मोकळा झाला आहे”, असं जॉर्ज म्हणाले. हे वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे बदललं नशीब; इंजिनिअर महिन्याला कमावतोय लाखो रुपये भारतीय संरक्षण दलांतील तिन्ही सैन्यदलांत महिला अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी आता मिळू लागली आहे. हवाई दलात महिला वैमानिक युद्धावेळी फायटर वैमानिक म्हणून काम करत आहेत. तसंच लष्करातही अनेक महत्त्वाच्या पदांवर महिलांना अशी संधी मिळत आहे. आता नौदलानेही महिलांना समान संधी दिली आहे. त्यामुळे भविष्यात सैन्यदलात अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणींच्या पंखांना बळ मिळेल.