झोपण्याचे फायदे
मुंबई, 16 डिसेंबर : चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार आणि व्यायामाइतकीच पुरेशी झोपदेखील महत्त्वाची आहे. पुरेशी झोप घेतल्याने शरीर ताजंतवानं होतं. मेंदूचं आरोग्य चांगलं राहतं. मानसिक आणि डोळ्यांशी निगडित समस्या निर्माण होत नाहीत. वय 50 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही रोज रात्री पाच तासांपेक्षा कमी वेळ झोपत असलात, तर ही गोष्ट धोकादायक ठरू शकते. कमी झोप घेतल्याने डायबेटीस, हृदयविकार, डिप्रेशनसारखे गंभीर विकार होऊ शकतात, असं एका संशोधनाच्या निष्कर्षातून स्पष्ट झालं आहे. या संशोधनातून अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. `दैनिक भास्कर`ने याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वय 50 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि रोज रात्री पाच तासांपेक्षा कमी वेळ झोप घेत असलात, तर ही गोष्ट आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे किमान दोन प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात, असा दावा प्लोस मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनात करण्यात आला आहे. संशोधनानुसार, रात्रीच्या वेळी पाच तासांपेक्षा कमी वेळ झोपणाऱ्या व्यक्तींना डायबेटीस, विविध प्रकारचे कॅन्सर, हृदयविकार, हार्ट स्ट्रोक, हार्ट फेल्युअर, फुफ्फुसांचे आजार, किडनी विकार, लिव्हरचे आजार, विस्मरण, पार्किन्सन्स, आर्थ्रायटिस आणि मानसिक आजार होण्याचा धोका असतो. हेही वाचा - हिवाळ्यात सर्वांची आवडती असते ही भाकरी; फायदेही आहेत तितकेच जबरदस्त या संशोधनाच्या प्रमुख लेखिका आणि यूसीएल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी या संस्थेतल्या रिसर्च असोसिएट डॉ. सेव्हरिन सेबिया यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, `एका वेळी अनेक गंभीर आजार जडण्याचा ट्रेंड उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वाढताना दिसत आहे. या देशांमधली निम्म्याहून अधिक लोकसंख्या किमान दोन क्रॉनिक आजारांनी ग्रस्त आहे. ही गोष्ट आरोग्य सेवा, रुग्णालयं आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान आहे.`
या संशोधनात ब्रिटनमधल्या आठ हजार शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांना वयाच्या 50व्या वर्षापर्यंत कोणत्याही स्वरूपाचा क्रॉनिक किंवा दीर्घ काळ चालणारा आजार नव्हता.शास्त्रज्ञांनी त्यांना दर चार ते पाच वर्षांनी पुढची 25 वर्षं त्यांची झोप आणि आरोग्याविषयी माहिती देण्यास सांगितलं. ज्यांच्या झोपेचा मागोवा वयाच्या 50 व्या वर्षादरम्यान घेण्यात आला, त्यांनी पाच तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोप घेतल्याने त्यांना क्रॉनिक अर्थात जुनाट आजारांचा धोका 30 टक्के होता. त्यांची तुलना रोज सात तास झोप घेणाऱ्यांशी करण्यात आली. वयाच्या 60व्या वर्षी हा धोका 32 टक्के, तर 70व्या वर्षी 40 टक्क्यांपर्यंत वाढला होता. पुरेशी झोप न घेण्याच्या सवयीमुळे मृत्यूचा धोका 25 टक्के असल्याचं दिसून आलं. `वय वाढतं, तशी झोपेची सवय बदलत जाते. क्रॉनिक किंवा गंभीर आजारांपासून दूर राहायचं असेल तर रोज रात्री सात ते आठ तास शांत झोप घेणं गरजेचं आहे. यापेक्षा कमी झोप घेण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चांगली झोप लागावी यासाठी खोलीत अंधार, शांतता आणि योग्य तापमान असणं गरजेचं आहे. झोपण्यापूर्वी जड पदार्थांचं सेवन टाळावं आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसपासून दूर राहावं, `असं डॉ. सेबिया यांनी सांगितलं.