नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : प्रसूतीनंतर महिलांमध्ये काही सामान्य समस्या आणि शारीरिक त्रास होणे ही सर्वसामान्य बाब आहे. बहुतेक महिला या अस्वस्थ गोष्टींमधून जातात. मुलाला जन्म देणे ही काही साधी गोष्ट नाही, प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होतात आणि शरीराची झालेली झीझ भरून निघायला थोडा वेळ लागतो. परंतु, हळूहळू सर्व गोष्टी ठीक होऊ लागतात आणि काही काळानुसार आपोआप सामान्य होतात. प्रसूतीनंतर महिलांनी आपली स्वच्छता आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचे शरीर आणि त्यातील सर्व बदल समजून घेऊन तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि मुलाबरोबरच स्वतःलाही वेळ द्यावा. तुम्ही स्वतःला निरोगी राखाल तरच तुम्ही तुमच्या मुलाची काळजी घेऊ शकाल. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी प्रसूतीनंतरच्या काही कॉमन आरोग्य प्रॉब्लेमविषयी सांगणार आहोत. जाणून घेऊया… प्रसूतीनंतरच्या सर्वसामान्य समस्या - रक्तस्त्राव - हेल्थलाइन डॉट कॉमच्या माहितीनुसार, प्रसूतीनंतर लगेच रक्तस्त्राव होणे सामान्य असले तरी, बहुतेक स्त्रियांना बाळंतपणानंतर दोन ते सहा आठवडे रक्तस्त्राव होत राहतो. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होणे हे सामान्य असते आणि वेळेनुसार हा त्रास कमी होऊ लागतो, परंतु जर रक्तस्त्राव वेळेनुसार सामान्य होण्याऐवजी वाढू लागला आणि सोबत रक्त गोठण्याची समस्या देखील असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संसर्ग - शरीरात शस्त्रक्रिया आणि टाके पडल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रसूतीनंतर स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अशा स्थितीत लघवी करताना वेदना, ताप, लालसरपणा, जळजळ होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
स्तनामध्ये वेदना - गर्भधारणेमध्ये किंवा प्रसूतीनंतर स्तन दुखणे ही सर्वसामान्य बाब आहे. सुरुवातीला स्तनपान करताना सूज येणे आणि वेदना होणे हे सामान्य आहे, त्यातून आराम मिळण्यासाठी तुम्ही थंड आणि गरम कॉम्प्रेस वापरू शकता. कित्येक दिवस तुम्हाला स्तनात दुखणे, फ्लूसारखी लक्षणे, लालसरपणा आणि ताप जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हे वाचा - पिंक टॅक्स काय असतो भाऊ? तो महिलांनाच का द्यावा लागतो? नैराश्य - प्रसूतीनंतर अस्वस्थ वाटणे किंवा थोडा मूड खाली-वर होणे हे सामान्य आहे. हा त्रास बहुतेक सर्व स्त्रियांना जाणवतो. परंतु, जास्त काळानंतरही तुम्हाला असेच वाटत असेल, ज्यामुळे तुम्ही बाळाची काळजी नीट घेऊ शकत नसाल. तर ते नैराश्याचे लक्षण असू शकते. असे वाटताच जोडीदाराशी बोला आणि चांगल्या डॉक्टरांची मदत घ्या.