Oranges
चीन,29 जानेवारी: विमानतळावर एक्स्ट्रा बॅगेज (Extra Baggage) झाल्यामुळे द्यावं लागणारं अतिरिक्त शुल्क (Baggage Fee) वाचवण्यासाठी चार प्रवाशांनी तब्बल तीस किलो संत्री (Oranges) खाण्याची अजब घटना चीनमधील (China) एका विमानतळावर घडली आहे. यामुळं या प्रवाशांचं बॅगेज शुल्क वाचलं; पण या पैसे वाचवण्याच्या आततायी उपायामुळं त्यांना दुसऱ्याच एका त्रासाला तोंड द्यावं लागलं. आग्नेय चीनच्या युनान प्रांतातल्या (Yunnan Province) कनमिंग एअरपोर्टवर (Kunming Airport) ही अजब घटना घडली. या चार प्रवाशांनी अवघ्या तीस मिनिटात तीस किलो संत्री फस्त केली. ग्लोबल टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, कनमिंग इथं व्यावसायिक कामानिमित्त आलेल्या वांग नावाच्या व्यक्तीनं त्याच्या तीन सहकाऱ्यांसह एक तीस किलो संत्र्याची पेटी 50 युआनमध्ये (564 रुपये) खरेदी केली. घरी परत जाण्यासाठी ते कनमिंग विमानतळावर आले असता, ते प्रवास करणार असलेल्या विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना या संत्र्याच्या पेटीसाठी प्रती किलो 10 युआन या प्रमाणे एकूण 300 युआन (3384 रुपये) शुल्क भरावं लागेल असं सांगितलं. ही किंमत तर त्यांनी खरेदी केलेल्या संत्र्याच्या किंमतीपेक्षाही अधिक होती. आता काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला, तेव्हा त्यावर उपाय म्हणून त्यांनी चक्क ती संत्री खाऊन टाकण्याचा मार्ग स्वीकारला. अवघ्या अर्ध्या तासात त्या चौघांनी ती तीस किलो संत्री खाउन टाकली. मात्र एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आम्लयुक्त फळं खाल्ल्यामुळं त्यांना माउथ अल्सरच्या (Mouth Ulcer) त्रासाला सामोरं जावं लागलं. एवढी संत्री एकदम खाल्ल्यानं त्यांच्या तोंडात प्रचंड फोड आले. हा शारीरिक त्रास सहन करण्याबरोबरच त्यावरील उपचारासाठीही त्यांना पैसे खर्च करावे लागले. पैसे वाचवण्यासाठी केलेल्या हा अतिरेकी उपाय त्यांच्या चांगलाच अंगलट आला आणि या आपल्या शहाणपणाची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली.या दुखण्याचा प्रचंड त्रास सहन करण्याबरोबरच औषधोपचाराचासाठी खर्चाचा फटकाही त्यांना सोसावा लागला. थोडे पैसे वाचवण्यासाठी त्यांनी केलेला हा उपाय कायमचा आठवणीत राहणारा ठरला. आता आयुष्यात पुन्हा संत्री खाण्याची त्यांची इच्छा होणार नाही.
हे देखील वाचा - भारताने श्रीलंकेला दिली ‘संजीवनी’; कोरोना लशीचे 5 लाख डोस मोफत
असाच एक किस्सा ऑस्ट्रेलियातील एका विमानतळावर घडला होता. एका महिलेनं एक्स्ट्रा बॅगेजचं शुल्क वाचवण्यासाठी आपण गरोदर असल्याची बतावणी करत, जास्तीचे कपडे आणि लॅपटॉपचा चार्जर आपल्या पोटावर लपवला होता. एवढचं नाही तर सिक्युरिटी चेकमधून गेल्यानंतर तिनं तिचा लॅपटॉपदेखील आपल्या जंपसूटच्या मागच्या बाजूला लपवला होता.