नवी दिल्ली, 10 मार्च : धूम्रपान (Smoking) हे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं. असं असलं तरी अनेक जण धूम्रपान करतात, या व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे धुम्रपानाच्या दुष्परिणामांबाबत अवेअरनेस (Awareness) निर्माण करणं आवश्यक ठरतं. दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी नो स्मोकिंग डे (No Smoking Day) साजरा केला जातो. या दिवशी धूम्रपानाचा आरोग्यावर तसेच दैनंदिन जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामाविषयी जनजागृती केली जाते. तसेच अनेक संस्था, ग्रुप्स धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या लोकांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देतात. सिगारेटमधील (Cigarette) घातक द्रव्यांमुळे केवळ धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीलाच नव्हे तर त्या व्यक्तीच्या आसपास असलेल्या लोकांनाही त्रास होतो. पॅसिव्ह स्मोकिंगमुळे देखील फुफ्फुसे आणि श्वासनलिकेशी संबंधित विकार होऊ शकतात. म्हणूनच नो स्मोकिंग डे 2021 च्या निमित्ताने हे व्यसन सोडण्यासाठी आपल्या मित्रांना, कुटुंबातील व्यक्तींना प्रोत्साहित करा. (हे वाचा- health tips हे हेल्दी फॅट्स असणारे 5 पदार्थ नक्की खा, अजिबात वाढणार नाही वजन ) जर तुम्ही धूम्रपान सोडू इच्छित असाल किंवा तुमचा मित्र, कुटुंबातील व्यक्ती किंवा नातेवाईक या व्यसनापासून परावृत्त व्हावेत, यासाठी मार्ग शोधत असाल तर या काही टिप्स तुम्ही जरूर फॉलो करा- 1. धूम्रपानाशी संबंधित सर्व गोष्टी जसे की लायटर, ॲश ट्रे टाकून दिल्या आहेत ना याची खात्री करा. 2. धूम्रपानाच्या दुष्परिणामांबाबत सविस्तर माहिती देणारे व्हिडीओ पाहा, पॉडकास्ट (Podcast) ऐका. 3. निकोटीनची (Nicotine) तल्लफ कमी करण्यासाठी कॅफेनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. 4. व्यसनमुक्तीसाठी स्वयंसेवी संस्था, गट किंवा संघटनांची मदत घ्या. 5. धूम्रपान न करणाऱ्या मित्रांच्या सोबत आणि धूम्रपानास परवानगी नसलेल्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ रहा. 6. थकव्यामुळे निकोटीनची तीव्र इच्छा निर्माण होते. त्यामुळे दररोज पुरेशी विश्रांती घ्या. निरोगी जीवनशैलीचे पालन करा. (हे वाचा - Explainer: काय आहे Maternity Benefit Act? मातृत्व रजेचे फायदे काय जाणून घ्या ) 7. आपले शरीर हायड्रेटेड ठेवा आणि नियमित व्यायम करा 8. धूम्रपान सोडण्याकरिता मदतीसाठी तयार केलेले अॅप्स डाऊनलोड करा. 9. मित्र किंवा कुटुंबातील व्यक्तींचा असा एक ग्रुप करा, जेणेकरुन धूम्रपान करण्यास प्रवृत्त होता, तेव्हा ते टाळण्यासाठी तुम्ही ग्रुपमधील व्यक्तींशी संभाषण करु शकाल किंवा त्यांच्या सोबत राहू शकाल. 10. धूम्रपान सोडा या हेल्पलाईनशी देखील तुम्हाला संपर्क करता येईल. 11. निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी घ्या 12. धूम्रपान सोडतेवेळी तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्याकडे काही गोष्टी आहेत ना याची खात्री करा. 13. धूम्रपान सोडल्यानंतर तसा वॉलपेपर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर ठेवा, म्हणजे शक्य झालेल्या गोष्टीची आठवण तुम्हाला सातत्याने राहिल.