नवी दिल्ली, 18 जानेवारी : भारतात कोरोना लशीमुळे (CORONA VACCINE) एका व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी बातमी समोर आली आणि सर्वांनाच धक्का बसला. आता या बातमीबाबत केंद्र सरकारनं पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू लस घेतल्यानं झाला नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोरोना लशीमुळे मृत्यू झाल्याची बातमी खोटी असल्याचं केंद्रानं सांगितलं आहे. उत्तर प्रदेशात एका आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाला, असा दावा सोशल मीडियावर केला जातो आहे. मुरादाबादमधील सरकारी रुग्णालयात हा व्यक्ती काम करत होता. लस घेतल्यानंतर 24 तासांत रविवारी त्याचा मृत्यू झाला अशा बातमी सोशल मीडियावर पसरली.
उत्तर प्रदेश सरकारनंदेखील ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. या आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला आहे, अशी माहिती राज्याच्या फॅक्ट चेक ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. हे वाचा - वुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस? VIRAL VIDEO 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या या अभियानादरम्यान आता काहीशी चिंताजनक माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना वॅक्सिन (Corona Vaccine) घेतल्यानंतर आतापर्यंत एकूण 447 लोकांवर प्रतिकूल परिणाम पाहायला मिळाला आहे. यापैकी तीन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही लोकांना वॅक्सिनच्या किरकोळ समस्या दिसल्या असल्या तरी, ही सौम्य लक्षण असल्याने घाबरण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. लसीकरणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी लशीबाबत बोलताना सांगितलं की, आपले वैज्ञानिक आणि विशेषज्ञ ज्यावेळी दोन्ही मेड इन इंडिया वॅक्सिन सुरक्षित आणि प्रभावी असल्याबाबत आश्वस्त झाले, त्यावेळीच या वॅक्सिनला परवानगी देण्यात आली. हे वाचा - 94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला! नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. मोदी म्हणाले, ‘‘भारतातील व्हॅक्सिन शास्ज्ञज्ञ, आपली मेडिकल सिस्टम, भारताची संपूर्ण प्रक्रियेबाबत संपूर्ण जगात विश्वासार्हता आहे. आपण हा विश्वास आपल्या ट्रॅक रेकॉर्डमुळे मिळवला आहे. आपल्या शास्त्रज्ञांना आणि विशेषज्ज्ञांना दोन्ही लशींबाबत खात्री पटल्यानंतरच, त्यांनी या लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशवासियांनी कोणताही प्रोपेगँडा, अफवा आणि खोट्या प्रचारापासून सावध राहिले पाहिजे"