जयपूर, 17 जानेवारी : कोरोना व्हायरस लसीकरणची (Corona Vaccination) देशात शनिवारी सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सध्या भारतामध्ये राबवला जात आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा कार्यक्रम सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात कोव्हिड योद्धांना लस टोचवण्यात येणार आहे.
राजस्थानमध्ये (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी शनिवारी कोरोना लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी एसएमएस मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुधीर भंडारी (Dr. Sudhir Bhandari) यांनी पहिली लस टोचून घेतली. त्यानंतर 94 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक (94 year old man) डॉ. पी.सी. डांडिया यांनी देखील लस टोचून घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
ज्येष्ठ नागरिकांना सल्ला
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशीच लस टोचून घेणारे डांडिया हे बहुधा देशातील सर्वात ज्येष्ठ नागरिक आहेत. या निमित्तानं ‘न्यूज 18 राजस्थान’नं त्यांच्याशी खास संवाद साधला. त्यावेळी “मेडिकल कॉलेजमध्ये माझं ऑफिस आहे. मला जे काम सांगितलं जातं ते मी करतो,’’ अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याचबरोबर, “माझ्या वयाच्या व्यक्ती देखील लस घेऊ शकतात. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे त्यावर लस घेणे हा चांगला उपाय आहे,’’ असा सल्ला डांडिया यांनी यावेळी दिला.
गेहलोत यांची प्रशंसा
डॉ. पी.सी.डांडिया यांनी यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची प्रशंसा केली. “कोरोनाच्या संकटामध्ये माझ्या गेहलोत यांच्यासोबत 9 बैठका झाल्या, त्यांनी राजस्थानमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चांगलं काम केलं आहे,’’ असं त्यांनी सांगितलं.
कोण आहेत डॉ. डांडिया?
94 वर्षांचे डॉ. पी.सी. डांडिया हे सध्या एसएमएस मेडिकल कॉलेजमध्ये मानद प्राध्यापक (emeritus professor) म्हणून कार्यरत आहेत. ते रिटारमेंटच्या पूर्वी याच कॉलेजमधील फार्मालॉजी विभागात काम करत होते. डॉ. डांडिया गेल्या 72 वर्षांपासून मेडिकल कॉलेजशी संलग्न आहेत. त्यांच्या कार्यकाळात एसएमस मेडिकल कॉलेजमधील तब्बल 22 प्राचार्य रिटायर झाले आहेत.