ब्राम्हीला आयुर्वेदात मेंदूची ताकद वाढवणारी औषधी वनस्पती म्हणून महत्व आहे. ब्राम्हीचे फायदे किती आहेत ते जाणून घेऊयात.
जॉर्जिया, 29 जानेवारी : गेल्या वर्षभराहून अधिक काळ जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूचा (Corona Virus) कहर आता थोडा कमी झाल्यासारखं वाटतं आहे. काही लशीही आल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही धोका अद्याप कमी झालेला नाही असा इशारा शास्त्रज्ञ, डॉक्टर्स आणि यंत्रणेतील सर्व जण वेळोवेळी देत आहेत. त्याबद्दलचं संशोधनही जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सुरू आहे. त्यामुळे नवनवी माहिती हाती येत आहे. अशाच एका संशोधनानुसार कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या मेंदूमध्ये (Brain) कोरोना लपून बसतो, असं दिसून आलं आहे. काही व्यक्ती कोरोनाचा संसर्ग झाल्यावर काही दिवसांनी बऱ्या होतात. मात्र त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा अचानक मृत्यू होतो किंवा त्या गंभीर आजारी पडतात, अशी काही उदाहरणं दिसून आली आहेत. अशा घटनांमागे कोरोना विषाणू मेंदूत राहिलेला असल्याचं एक कारण असू शकतं, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. अमेरिकेतील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतील (Georgia State University) शास्त्रज्ञांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार कोरोना विषाणू मानवी मेंदूत वास्तव्य करू शकतो. ‘ आज तक ’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतल्या शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एका उंदरावर या गोष्टीचं निरीक्षण नोंदवलं. या उंदराला अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधी जडल्या. त्या उंदराला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर पाच ते सहा दिवसांतच विषाणू उंदराच्या मेंदूत जाऊन लपला. त्याच्या फुप्फुसांमधल्या कोरोना विषाणूंची संख्या मात्र तिसऱ्या दिवशीपासूनच घटू लागली होती. याचाच अर्थ असा, की कोरोना आता फुप्फुसांच्या ऐवजी शरीराच्या सर्वांत महत्त्वाच्या अवयवांकडे आपला मोहरा वळवतो आहे. मेंदूत असलेल्या कोरोना विषाणूंची संख्या शरीरात अन्यत्र असलेल्या विषाणूंच्या तुलनेत एक हजार पटींनी अधिक होती, ही चिंताजनक बाब असल्याचंही शास्त्रज्ञ म्हणाले. हे वाचा - बायकोला डावलून प्रसिद्ध डॉक्टरांनी घेतली कोरोना लस; मग काय घडलं पाहा LIVE VIDEO जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासाबद्दलचा लेख व्हायरसेस नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाल्याचं वृत्त साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलं आहे कोरोना संसर्गानंतर ज्या व्यक्ती बऱ्या होतात, मात्र बऱ्याच काळापर्यंत काही ना काही शारीरिक किंवा मानसिक व्याधींना सामोऱ्या जात आहेत, त्यांच्या मेंदूत कोरोना विषाणूचं अस्तित्व असू शकतं, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. अर्थात संसर्ग झालेल्या प्रत्येकाच्याच मेंदूवर कोरोनाचा दुष्परिणाम होतोय, असं नाही. पण कोरोना आपल्या शरीरातून गेला असं त्यांना वाटत असलं, तरी तो त्यांच्या मेंदूत घर करून राहू शकतो. या संशोधनातील प्रमुख अभ्यासक आणि असिस्टंट प्रोफेसर मुकेश कुमार (Mukesh Kumar) यांनी सांगितलं की, कोरोना संसर्ग झाल्यानंतर अनेकांमध्ये विविध प्रकारची लक्षणं दिसत आहेत. काहींना हृदयविकार होतो आहे, काहींची वास घेण्याची आणि चव घेण्याची क्षमता नष्ट होते आहे. या लक्षणांचं फुप्फुसांशी काही देणं-घेणं नाही. त्यांचा संबंध थेट मेंदूशी आहे. मेंदू ही एकमेव अशी जागा आहे त्याबद्दल माणसांना अद्याप सखोल माहिती नाही. त्यामुळे त्या जागी घर करणं कोरोनाला सोपं जाऊ शकतं. हे वाचा - हद्दच झाली! कोरोना नाही हे सिद्ध करण्यासाठी चाटलं ATM मशीन; शेअर केला LIVE VIDEO साधारणपणे कोणत्याही विषाणूजन्य संसर्गाचा परिणाम मेंदूवरही होतो. अंगाला सूज येणं, अंग दुखणं, शारीरिक क्रियांमध्ये बदल होणं, अशी लक्षणं दिसतात. कोरोना विषाणूचा संसर्गही यापेक्षा वेगळा नाही. त्यामुळेही अशी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे कोरोना हा केवळ श्वसनयंत्रणेशी निगडित विकार आहे, असा विचार करणं योग्य नाही, असं मुकेशकुमार म्हणतात. मेंदूवर त्याचा परिणाम झाला, तर त्याद्वारे केवळ फुप्फुसच नव्हे तर शरीरातील अनेक अवयवांवर तो परिणाम करू शकतो. कारण मेंदू हा अत्यंत संवेदनशील अवयव असून, आपल्या शरीराचा मध्यवर्ती प्रोसेसर आहे. त्यात काही गोंधळ झाला, तर संपूर्ण शरीरालाच धोका निर्माण होऊ शकतो, असं मुकेशकुमार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घेणं एवढंच आपल्या हातात आहे. हे वाचा - वारंवार वापरत असलेला MASK बदलण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्यासाठी सोपी ट्रिक कोरोनामुळे मेंदूवर होणाऱ्या परिणामांचा आम्ही अभ्यास करत आहोत. तसंच कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्ती पुन्हा अचानक गंभीर कशा होतात किंवा मरतात कशा, या बाबींचा अभ्यास आम्ही करतो आहोत, असंही मुकेशकुमार यांनी सांगितलं. मेंदूत घर करणाऱ्या कोरोना विषाणूमुळे कोणकोणत्या व्याधी होऊ शकतात, त्यावर कसा इलाज करता येऊ शकतो, कोरोना विषाणू मेंदूपर्यंत पोहोचू नये यासाठी काय करता येईल, याबाबत आता शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत.