मुंबई, 03 एप्रिल : कोरोना विषाणूचा (Corona Pandemic) फैलाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. या वेळी हा फैलाव अधिक वेगाने होत आहे. त्यादरम्यान कोरोना लसीकरण (Vaccination) कार्यक्रमही सुरू आहे. मात्र लसीकरणासंदर्भातही लोकांच्या मनात अनेक शंका उत्पन्न झाल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग का होतो आहे? कोरोना लसीकरणानंतरही काही जण कोरोनाबाधित झाले त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी लस घेतली आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याच्या अनेक केसेस समोर येत आहेत. त्यामुळे लशी प्रभावी नसल्याचे सवाल केले जाणं स्वाभाविक आहे. पण तरीही लस प्रभावी नाही असं मानणं योग्य नाही, असं तज्ज्ञ म्हणतात. कोणत्याही व्यक्तीने कोविड-19ची (Covid19) लस घेतल्यानंतर त्याला कोरोनाची बाधा होणं ही गोष्ट असामान्य का नाही? या प्रश्नाचं उत्तर लशीच्या कार्यप्रणालीत दडलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, लस ही शरीराच्या प्रतिकार यंत्रणेची (Immune System) प्रशिक्षक म्हणून काम करते. विषाणूशी कसं लढायचं आहे, याचं प्रशिक्षण लशीकडून घ्यायला शरीराच्या प्रतिकारयंत्रणेला काही आठवड्यांचा वेळ लागू शकतो. हे वाचा - मोदी सरकारने फक्त 45+ व्यक्तींनाच कोरोना लस देण्याचा निर्णय का घेतला? लस घेतल्यानंतर संसर्ग झाल्याच्या केसला ब्रेकथ्रू केस (Breakthrough Case) म्हणतात. जेव्हा लशीचा पूर्ण डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी संसर्ग होतो, तेव्हा त्याला ब्रेकथ्रू केस म्हटलं जाईल. म्हणजेच भारतातल्या कोरोना लशींच्या बाबतीत बोलायचं झालं, तर कोविशिल्ड (Covishield) किंवा कोव्हॅक्सिन (Covaxin) यापैकी कोणत्याही लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी एखाद्याला कोरोनाची लागण झाली, तर ती ब्रेकथ्रू केस मानली जाईल. इस्रायलमधल्या शोधात अशी गोष्ट समोर आली आहे, की लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर पहिल्या 12 दिवसांपर्यंत कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लस न घेतलेल्या व्यक्तीइतकीच असते. जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी या संस्थेचे अमीश एडाल्जा यांनी प्रवेंशन मॅगझिनला सांगितलं, की लस घेतल्यानंतर शरीरात कोरोना विषाणूविरोधातील अँटीबॉडी (Antibody) विकसित व्हायला तेवढा वेळ लागतो. हे वाचा - Corona Update: आता प्राण्यांसाठी कोरोना लस; रशियाने केली नोंदणी याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही लस 100 टक्के प्रभावी नसते. याचाच अर्थ असा, की कोणतीच लस विषाणूविरोधात 100 टक्के प्रतिकारक्षमता तयार करू शकत नाही. देवी या रोगाविरोधातली लस आतापर्यंतची सर्वांत प्रभावी मानली जाते; पण इतकी प्रभावी लस फार कमी वेळा तयार होते. सध्या जगभरात कोरोनाविरोधात जेवढ्या काही लशी वापरल्या जात आहेत, त्यातली कुठलीच 100 टक्के प्रभावी आहे, असा दावा केला जात नाहीये. सगळ्या लशी 85 ते 95 टक्के प्रभावी आहेत. अनेक लशी 90 टक्क्यांवर प्रभावी आहेत. लशीच्या माध्यमातून कोरोनाचं उच्चाटन करणं हा हेतू नसून, आजाराचं गंभीर स्वरूप आणि त्यातून होणारे मृत्यू रोखण्याच्या हेतूने लसीकरण केलं जात आहे.