मुंबई, 06 ऑक्टोबर : राज्यात (Maharashtra coronavirus) गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेट 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारी राज्य सरकारकडून ही दिलासादायक बातमी मिळालेली असताना त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज केंद्र सरकारने धक्कादायक अशी माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदराबाबत (death rate) केंद्रीय आरोग्य सचिवांनी चिंता व्यक्त केली आहे आणि कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी राज्याला इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या जिल्ह्यांबाबत माहिती दिली. सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या 25 जिल्ह्यांपैकी 15 जिल्हे फक्त महाराष्ट्रातच आहेत. म्हणजे देशात सर्वाधिक मृत्यूची नोंद झालेल्या जिल्ह्यांपैकी निम्म्याहून अधिक जिल्हे महाराष्ट्रातील आहेत आणि ही खूप चिंताजनक परिस्थिती आहे.
ही परिस्थिती पाहता मृत्यूदर कमी करण्याचं नवं टार्गेट आरोग्य सचिवांनी आता महाराष्ट्र सरकारला दिलं आहे. राज्यातील मृत्यूदर 1 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचं लक्ष्य आता सरकारला देण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारसमोर हे नवं आव्हान आहे. हे वाचा - तुमच्या घरातच आहे कोरोनापासून बचावाचा उपाय; AYUSH ने सांगितले आयुर्वेदिक उपचार खरंतर केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीपेक्षाही राज्याची वास्तवात भीषण परिस्थिती असू शकते. कारण जगाच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर कमी आहे. पण भारताची ही आकडेवारी फसवी असून आरोग्य व्यवस्था तोकडी असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. एप्रिलमध्ये भारतात कोरोनाचा मृत्यूदर 4 टक्के होता. तर ऑगस्टमध्ये तो 2.15% आणि आता सप्टेंबरमध्ये तो 1 टक्क्यापर्यंत आला आहे. View Survey तज्ज्ञांच्या मते अनेक रुग्णांना वेळेत सेवा मिळत नसून यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तो Covid मुळे झालेला मृत्यू आहे का, हे तपासायलासुद्धा कदाचित तज्ज्ञ उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती अनेक ग्रामीण भागात आहे. भारतात झालेल्या केवळ 86 टक्के मृत्यूंची नोंद करण्यात आली असून यामधील केवळ 22 टक्के रुग्णांच्या मृत्यूचे कारण नोंदवण्यात आले आहे, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. हे वाचा - जगभरातील 10 टक्के लोकसंख्या कोरोना पॉझिटिव्ह असण्याची शक्यता, WHOचा इशारा त्यामुळे तज्ज्ञांनी सांगितलेली ही देशाची वास्तव परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील मृत्यूदराचं चित्र यापेक्षाही भयावह असण्याची शक्यता नाकारता येत नाही.