garbage collector brothers
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी: महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांना जर एखादी पोस्ट किंवा योजना आवडली तर ते आपल्या अकाउंटवरून नेहमीच त्या इतरांबरोबर शेअर करत असतात आणि बाकी लोकांना सुद्धा अशा गोष्टींसाठी प्रोत्साहित करत असतात. नुकताच आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरून कचरा गोळा करणाऱ्या दोन भावांच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या दोघांच्या गाण्याच्या कौशल्याने प्रभावित झालेल्या महिंद्रा यांनी स्वतः हा video ट्विटरवर शेअर केलाच. पण हे करून ते थांबले नाहीत. त्यांनी या दोन भावांच्या टॅलेंटला वाव देण्यासाठी सोयही उपलब्ध करून दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी या बाबत दोन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीट मध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ‘ अतुल्य भारत! माझा मित्र रोहित खट्टरने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. हफिज आणि हबीबुर हे दोघे दिल्लीमध्ये न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करतात. प्रतिभेला कुठलीच सीमा नसते, हे यांच्याकडे पाहून समजतं. ती कुठेही उदयास येऊ शकते'.
पुढे दुसरं ट्वीट करत आनंद महिन्द्रांनी लिहिलंय की, ‘ त्यांची प्रतिभा ही स्पष्ट आहे, पण अजून कच्ची आहे. मी आणि रोहित त्यांच्या या कलेला वाव देऊ इच्छितो. दिल्लीमध्ये संध्याकाळच्या वेळी त्यांना ट्रेनिंग देऊ शकेल अशा संगीत शिक्षकाची माहिती कोणी मला देऊ शकेल का? कारण दिवसभर ते दोघं काम करत असतात.'
अवश्य वाचा - डब्बू अंकलनंतर आता साताऱ्यातील सुर्वे काकांचा धुमाकूळ; डान्स VIDEO होतोय तुफान व्हायरल आनंद महिन्द्रांच्या या निर्णयाचं लोकांनी खूप कौतुक होत आहे. वेळोवेळी अशा खऱ्या प्रतिभेला संधी मिळायला हवी अशा प्रकारच्या कमेंट्स लोकांकडून येत आहेत. त्याबरोबर या दोघांसाठी गाण्याचा शिक्षक मिळवून देणाऱ्या काही कमेंट्सही आल्या आहेत. सोशल मीडियाचा वापर फक्त व्हिडीओ शेअर करून फॉरवर्ड करण्यापुरता न ठेवता, त्यातून अशा प्रतिभेला वाव मिळाला तर ते जास्त संयुक्तिक ठरेल, हाच या viral video मागचा धडा.