लिव्ह इन रिलेशनशिप
**मुंबई, 03 डिसेंबर :**मुंबईतील वसईमधील श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या धोक्यांबद्दल समाजात पुन्हा एकदा चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्न न करता स्त्री-पुरूष एकत्र राहण्याला सुप्रीम कोर्टाकडून संमती मिळाली आहे. पण एकमेकांचे जोडीदार म्हणून राहताना दोघांनाही काही प्रमाणात अधिकार प्राप्त होतात तसेच कायदेशीर नियमांचं पालन करणंही तितकच महत्त्वाचं असतं. ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या पार्टनरमध्ये अनेकदा वाद उदभवतात त्यातून टोकाची भूमिका घेतली जाते. श्रद्धाच्या प्रकरणातही असंच काहीसं झालं. त्यामुळे लग्न न करता एकत्र राहताना कुठल्या नियमांचे पालन करायला हवं यावर ‘आज तक हिंदी’नं वृत्त दिलं आहे. वास्तविक पाहता ‘लिव्ह इन’मध्ये राहावं की नाही हा ज्याचा त्याचा अत्यंत खासगी प्रश्न आहे. पण याला सुप्रीम कोर्टाकडून मान्यता मिळालेली आहे. कोर्टानेच ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी काही नियम निश्चित केले आहेत. एखादं जोडपे ‘लिव्ह इन’चा विचार करत असेल तर त्याआधीच त्यांना या नियमांची माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं. हेही वाचा - डिलिव्हरी अॅपवरुन मागवलेले पदार्थ खराब निघाले तर? तक्रार करुन मिळवा नुकसानभरपाई श्रद्धा वालकरच्या प्रकरणात नेमकं काय झालं? श्रद्धा वालकर व आफताब अमीन पूनावाला यांच्यात प्रेम होते. दोघे वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हतं. परंतु, दोघांनी कुटुंबीयांचा विरोध पत्करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. ते दोघे दिल्लीमध्ये एकत्र राहू लागले. या वर्षी 18 मे रोजी दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर आफताबने श्रद्धाचा निर्घृण खून केला. पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून त्यांना दिल्लीच्या वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याने श्रद्धाच्या खुनाची कबुली दिली आहे. परंतु या घटनेनंतर ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपसंदर्भात मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता ‘लिव्ह इन’ रिलेशनशिप ही संकल्पना मूळतः पाश्चिमात्य देशांतून आलेली आहे. तिथं ही बाब अगदी सामान्य मानली जाते. भारतीय संस्कृतीत मात्र लग्न न करता स्त्री-पुरुष एकत्र राहणं योग्य मानलं जात नाही. परंतु बदलत्या काळाचा विचार केला तर भारतातही अशी संकल्पना हळूहळू रुजत असल्याचं पाहायला मिळते. देशातील मोठ्या शहरांमध्ये आता ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपचा प्रकार वाढत चालला आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने ही ‘लिव्ह इन’ला कायदेशीर मान्यता दिली आहे. ‘लिव्ह इन’ संदर्भात सुप्रीम कोर्टाचं मत काय? सुप्रीम कोर्टानुसार, दोन सज्ञान व्यक्ती एकमेकांच्या सहमतीने एकत्र राहत असतील तर कायद्याच्या दृष्टीने ही बाब अवैध मानली जात नाही. लग्न करून एखादं जोडपे ज्याप्रमाणे सोबत राहतं तसंच ‘लिव्ह इन’मधील जोडप्यालाही कोर्टाकडून मान्यता मिळालेली आहे. परंतु असे करताना कोर्टाच्या काही नियमांचं पालन केले जाणे आवश्यक आहे. या संदर्भात बोलताना चंडीगढ हायकोर्टाच्या ज्येष्ठ अधिवक्ता रिता कोहली म्हणाल्या की, भारतामध्ये ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपवर कुठलाही कायदा बनवण्यात आलेला नाही. परंतु सुप्रीम कोर्टाने याला मान्यता दिलेली आहे. या संदर्भात कोर्टासमोर काही प्रकरणं आली होती. त्यात अनेक महिलांना वर्षानुवर्षं सोबत राहत असतानाही त्यांच्या पार्टनरने अचानकपणे घरातून बाहेर काढले. त्या महिलांनी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पुरुषांसोबत लग्न केलेले नसल्यामुळे आर्थिक बाबीत त्यांना दावेदार मानले गेले नाही. वास्तविक पाहता त्या महिला अनेक वर्ष त्यांच्या जोडीदारासोबत राहिल्या तसेच समाजामध्येही त्यांना पुरूषांचा पार्टनर म्हणून पाहिलं गेलं. तरीही आर्थिक आधार त्यांना मिळाला नाही. लिव्ह इन राहणाऱ्या महिलांची हिच अडचण लक्षात घेऊन त्यांना सुरक्षा देण्याच्या दृष्टिकोनातून कोर्टाकडून लिव्ह इनला मान्यता देण्यात आली. याशिवाय महिलांचा शारीरिक, भावनिक आणि आर्थिक छळ होत असल्याने यापासून त्यांचा बचाव करण्याच्या दृष्टीने काही नियमही तयार करण्यात आले आहेत. हेही वाचा - घरातील लग्नकार्यासाठी नातेवाईकांना द्या खास निमंत्रण; WhatsAppवरून पाठवा लग्नपत्रिका लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी बनवलेले काही नियम लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना मुलगा आणि मुलगी दोघेही सज्ञान असणं गरजेचं आहे. जोडप्यामध्ये मुलगा किंवा मुलगी दोघांपैकी कोणीही एकजण अल्पवयीन असेल तर हे नाते अवैध मानले जाते व याला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मान्यता मिळत नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलगा व मुलगी पती-पत्नीप्रमाणे एक सोबत राहत असतील तर याला मान्यता मिळते. दोघांनी किती वर्षं सोबत राहावे याची निश्चित मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. परंतु सलग अनेक वर्ष त्यांनी सोबत राहणं आवश्यक आहे. इच्छा असेल तोपर्यंत सोबत राहणे आणि वाटेल तेव्हा विभक्त झाल्यास या नात्याला लिव्ह इन म्हणून मान्यता मिळत नाही. लिव्ह इनमध्ये महिलांना देखभालीचा अधिकार लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या महिलेची पत्नीप्रमाणे देखभाल केली जाणं आवश्यक आहे. यासाठी ती सहकारी पुरुषाकडे देखभालीसंदर्भात मागणी करू शकते. कायदेशीरदृष्ट्या आपण पती-पत्नी नाही त्यामुळे महिलेची देखभाल करणार नाही, अशी भूमिका पुरुष घेऊ शकत नाहीत. रिता कोहली यांच्या मते, सीआरपीसीच्या कलम 125 नुसार, महिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल किंवा ती विभक्त झाली तरीही तिची पुरुष सहकाऱ्याकडून देखभाल केली जाणं आवश्यक आहे. पुरुष यासाठी नकार देत असेल तर कोर्टामार्फत आर्थिक मदतीची मागणी संबंधित महिला करू शकते. लिव्ह इनमध्ये अपत्य झाल्यास आई-वडिलांच्या संपत्तीचा अधिकार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना जोडप्याला अपत्य झाल्यास आई-वडिलांच्या संपत्तीचा पूर्ण अधिकार त्याला मिळतो, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एक पार्टनर त्याच्या दुसऱ्या पार्टनरला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत असेल आणि नंतर लग्नासाठी नकार देत असेल तर हा गुन्हा मानला जातो. या परिस्थितीत गुन्हा दाखल करता येऊ शकतो आणि संबंधित पार्टनरला शिक्षाही होऊ शकते. लग्न झालेली व्यक्ती लिव्ह इनमध्ये राहू शकते का? काही वर्षांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने विवाहित व्यक्ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही हा गुन्हा ठरतो असा निर्वाळा दिला होता. यावर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने असहमती दर्शवली. पंजाब हायकोर्टानुसार, दोन सज्ञान व्यक्ती एकमेकांच्या सहमतीने सोबत राहू शकतात. याबाबत बोलताना रीता कोहली म्हणाल्या की, जर एखादा पुरुष विवाहित असेल आणि तो दुसऱ्या एका महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहण्यास इच्छुक असेल तर तो त्याचा खासगी प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येकाला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा गुन्हा मानला जात नाही. परंतु, एखादी व्यक्ती पत्नीशी घटस्फोट न घेता दुसऱ्या महिलेसोबत लग्न करत असेल तर तो गुन्हा ठरतो. कारण हिंदू मॅरेज ॲक्टनुसार, एक पत्नी असताना दुसरीशी विवाह करणे गुन्हा आहे.
लिव्ह इनमध्ये राहणारी महिलाही करू शकते घरगुती हिंसाचाराची तक्रार रिता कोहली म्हणाल्या की, सुप्रीम कोर्टाने विवाहित महिलांप्रमाणे लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलांना घरगुती हिंसाचार कायदा 2005 चे संरक्षण दिले आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा शारीरिक छळ होत असेल तिला मारहाण होत असेल तर पोलिसात तक्रार करता येते. महिलेला एखाद्या व्यक्तीशी प्रेम असेल आणि तिला त्याच्यासोबत राहायचे असेल तर यात वाईट काहीही नाही. परंतु, नवीन नात्यासाठी जुने नाते सोडणे योग्य नाही असेही कोहली यांनी सांगितले. तरुण किंवा तरुणी यांना लिविंगमध्ये राहायचे असेल तर त्यांनी आधी आई- वडिलांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. शिवाय वेळोवेळी त्यांच्या संपर्कात राहणंही गरजेचं आहे. चांगल्या वाईट काळामध्ये आपण आप्तस्वाकियांच्या संपर्कात राहिल्यास त्याचा फायदा होतो. आपल्या बाजूला असलेले नाते भक्कम असेल तर एखादी व्यक्ती आपले नुकसान करण्याआधी दहा वेळा विचार करते. त्यामुळे नात्यांना विश्वासात ठेवणं तितकंच गरजेचं आहे लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणी महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्या पुरुष साथीदारावर अवलंबून असता कामा नये. महिलांप्रमाणे पुरुषांसाठीही हीच बाब लागू पडते. एखाद्या व्यक्तीवर दीर्घ काळापर्यंत आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहिल्यास अनेकदा नात्यांमध्ये यामुळे दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिल्यास एकमेकांवरील अवलंबित्व कमी होऊ शकतो. लिव्ह इनमध्ये राहताना या गोष्टीची घ्यावी काळजी लिव्ह इनमध्ये राहणे महिला व पुरुष या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे यावर विचार करून निर्णय घ्यायला हवा. कायदेशीरदृष्ट्या लिव्ह इन मान्यता असली तरी सामाजिक जीवनात वावरताना या संबंधांना मान्यता मिळत नाही. लिव्ह इनमध्ये सोबत राहणे हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे, परंतु काही गोष्टींचा विचार केला जाणे गरजेचे आहे. एकमेकांवर विश्वास हवा एखादे जोडपे लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांनी एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आजारी असताना किंवा कुठलेही अडचण असेल तसेच आर्थिक दृष्ट्या मोठे संकट असेल तर अशा स्थितीमध्ये आपल्या साथीदाराची पालकाप्रमाणे काळजी घेतली जाणे गरजेचे असते. नात्यांमधील स्त्री आणि पुरुष या दोघांनाही ही बाब लागू पडते. लग्न झाल्यानंतर पती-पत्नी ज्या पद्धतीने एकाच घरात राहतात तसेच लिव्ह इन रिलेशनशिप मध्येही जोडप्यांना एकत्र राहावे लागते. वास्तविक पाहता त्यांच्यातील नाते पती-पत्नीप्रमाणेच असते त्यामुळे लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिला-पुरुषांनी एकमेकांबद्दल प्रामाणिक असणं ही फार महत्त्वाचं आहे. इतर नात्यांप्रमाणे एकमेकांबद्दल सन्मान असणंही आवश्यक नातं कायम ठेवण्यासाठी प्रेमासह एकमेकांबद्दल सन्मान असणंही आवश्यक असतं. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांनी एकमेकाबद्दल सन्मान ठेवणं गरजेचं आहे. दोघांमध्ये कितीही प्रेम असले तरी एकमेकांबद्दल सन्मान नसेल तर हे नाते दीर्घकाळ टिकू शकत नाही. हिंसक जोडीदारासोबत चुकूनही राहू नका प्रेम करणाऱ्या जोडप्यांमध्ये भांडण होणं अतिशय सामान्य बाब आहे. आपण ज्या जोडीदारासोबत राहणार आहोत त्याच्या सवयी, वागणं याबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे. तुमचा जोडीदार खूप रागीट असेल किंवा रागाच्या भरात ती व्यक्ती मारहाण करत असेल तर अशा जोडीदारासोबत राहणे योग्य ठरणार नाही. तरुण किंवा तरुणी यांचा हिंसक स्वभाव चुकीचाच असतो. दोघांपैकी एखादाचा स्वभावही हिंसक असेल तर जोडीदारासाठी मोठे संकट निर्माण होऊ शकते. रागामध्ये स्वतःवर नियंत्रण मिळवता आल्याने अनेकदा अघटीत घटना घडू शकते, याचा विचार केला जाणं फार महत्त्वाचं आहे.