Swayamvr Mika Di vohti
मुंबई, 25 जुलै : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक मिका सिंग नेहमी चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या ‘स्वयंवर - मिका दि वोटी’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमाद्वारे तो स्वतःसाठी जीवनसाथी शोधतोय. अखेर त्याला त्याची जीवनसाथी भेटली आहे. आकांक्षा पुरी असं तिचं नाव असून तिने स्वयंवर - मिका दि वोटी ही स्पर्धा जिंकली आहे. आकांक्षा पुरीने प्रांतिका दास आणि नीत महल या टॉप स्पर्धकांना मागे पाडत या स्पर्धेत बाजी मारली आहे.आकांक्षाने मिकावरच्या प्रेमाची सगळ्यांसमोर अतिशय हटके पद्धतीने कबुली दिली आणि मिका तिच्यावर फिदा झाला. आणि अखेर त्याने आकांक्षा ची ‘मिका दि वोटी’ म्हणून निवड केली. आकांक्षा पुरी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल असून बऱ्याच वर्षांपासून काम करत आहे. हे दोघे आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते असं म्हटलं जातं. स्वयंवर - मिका दि वोटी या कार्यक्रमात देशाच्या वेगवेगळ्या भागातून 12 तरुणी सामील झाल्या होत्या. त्यांच्यामध्ये विविध स्पर्धा होऊन त्यांच्यामधून एक जण मिकाची जीवनसाथी बनणार होती. विशेष म्हणजे आकांक्षा पुरी ही स्पर्धेत सुरुवातीपासून नव्हती तर तिची या शो मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. आकांक्षा आणि मिका हे दोघे एकमेकांना मागील अनेक वर्षांपासून ओळखतात. ते दोघे चांगले मित्र आहेत. अशातच आकांक्षाने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत स्पर्धेत बाजी मारली. हेहि वाचा - Katrina Kaif: कतरीनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमाचं काम वेगाने सुरु, साऊथ अभिनेत्यासह करणार धिंगाणा आकांक्षा पुरीने या लग्नाविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, ‘मी आणि मिका मागच्या 10 ते 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. पण मी या शो मध्ये त्याला अन्य मुलींसोबत पाहिल्यावर मला प्रेमाचा साक्षात्कार झाला. आणि मी या शो मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. आज मिकाने मला त्याची जीवनसाथी म्हणून निवडल्याने मी खूप आनंदी आहे.’
पण मिका सिंग आणि आकांक्षा पुरी लगेच लग्न करणार नाहीत. मिका सिंगने शो मध्ये आकांक्षाच्या गळ्यात वरमाला टाकली असली तरी तो फक्त शोचाच एक भाग होता. त्याने आकांक्षाची निवड केली हे दाखवण्यासाठी तिच्या गळ्यात वरमाला घातली. मिका सिंगने आकांक्षा सोबत काही वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते एकमेकांना आधी समजून घेणार आहेत. त्या नंतरच ते दोघे लग्न करतील अशी माहिती आहे.