मुंबई, 21 मार्च: तेलगू इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली डी क्रूझचे (Gayathri aka Dolly D Cruze died in car accident) वयाच्या 26 व्या निधन झाले आहे. रस्ते अपघातात या अभिनेत्रीने जीव गमावल्याची घटना घडली आहे. गायत्री ज्या कारमधून प्रवास करत होती त्या कारचा हैदराबादच्या गाचीबोवली भागात भीषण अपघात झाला. शुक्रवारी 18 मार्च रोजी रोजी होळीच्या दिवशीच ही घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार शुक्रवारी उशीरा होळी सेलिब्रेशननंतर ही अभिनेत्री घरी परतत होती, तिच्यासह तिचा मित्र राठोड देखील होता. राठोड यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कार चालवत असताना डिव्हायडरवर गाडी आपटल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाल्याचे समजते आहे. रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री गायत्रीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मित्र राठोड जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याठिकाणीच त्याने अंतिम श्वास घेतला. या दोघांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचा मृत्यू तेलगू मनोरंजन इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का आहे. मीडिया अहवालानुसार, रस्त्याने पायी जात असलेल्या एका महिलेला कारची धडक बसली होती. मात्र, कार उलटल्याने महिला त्याखाली दबली गेली आणि तिचाही जागीच मृत्यू झाला. हे वाचा- सामना सुरू असताना कोसळली प्रेक्षकांची गॅलरी; 200 जण जखमी, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO इन्स्टाग्राम-युट्यूबवरुन मिळवली होती प्रसिद्धी गायत्री उर्फ डॉली डी क्रूझने सुरुवातीला इन्स्टाग्राम (Gayathri aka Dolly D Cruze instagram) पोस्ट तसेच जलसा रायडू या युट्युब चॅनेलद्वारे लोकप्रियता मिळवली. सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर तिने ‘मॅडम सर मॅडम अंते’ या वेबसिरीजमध्ये काम केले होते. याशिवाय तिने अनेक शॉर्ट फिल्म्समध्येही काम केले आहे. या अभिनयासाठी प्रेक्षकांकडून तिने भरभरून प्रेमही मिळवले होते. तिच्या निधनामुळे साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.